पहिल्याच दिवशी शाळेबाहेर भरले विद्यार्थ्यांचे वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 01:17 AM2018-06-27T01:17:28+5:302018-06-27T01:18:39+5:30
तालुक्यातील डोंगरसावंगी येथील जिल्हा परिषद शाळेत वर्गखोल्या बांधण्यात याव्या, या मागणीसाठी पालक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या पुढाकाराने शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील डोंगरसावंगी येथील जिल्हा परिषद शाळेत वर्गखोल्या बांधण्यात याव्या, या मागणीसाठी पालक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या पुढाकाराने शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकण्यात आले. त्याचबरोबर शाळाही बाहेरच भरविण्यात आली. आमदार कृष्णा गजबे यांच्या मध्यस्थीनंतर दुपारी शाळेचे कुलूप उघडण्यात आले.
डोंगरसावंगी येथे पहिली ते चवथीपर्यंत वर्ग आहेत. शाळेची पटसंख्या १०० एवढी आहे. शाळेच्या दोन इमारती पाच वर्षांपूर्वीच जीर्ण झाल्या आहेत. तिसऱ्या इमारतीला भेगा गेल्या आहेत. या तिन्ही इमारती पावसाळ्यात कोसळण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद बंधकाम उपविभाग देसाईगंजच्या अधिकाºयांनी या इमारतीचे आॅडीट स्ट्रक्चर केल्यानंतर या ठिकाणी मुले बसवू नये, असे पत्र शाळेला दिले आहे. त्यामुळे मागील सत्रापासून शाळा ग्रामपंचायतीच्या इमारतीत भरविली जात आहे. जुन्या इमारती मोडकळीस आल्याने नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करावे, यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व गावकºयांनी प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला. मात्र जिल्हा परिषदेने याकडे दुर्लक्ष केले. यावर्षीच्या सुट्यांमध्ये बांधकाम होईल, अशी अपेक्षा पालक बाळगूण होते. बांधकाम न झाल्यास पुढील शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले जाणार नाही, असा ठराव शाळा समितीने १३ एप्रिल रोजी घेतला होता. मात्र यावर्षी सुध्दा बांधकाम करण्यात आले नाही.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी, पालक तसेच गावकरी शाळेसमोर जमले. शाळेच्या दरवाजाला कुलूप ठोकून विद्यार्थ्यांना शाळेबाहेर बसविले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी उरकुडे, संवर्ग विकास अधिकारी मोहीतकर, शिक्षण विस्तार अधिकारी संतोषवार यांनी डोंगरसावंगी शाळेला भेट दिली. पालकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र जोपर्यंत शाळेचे बांधकाम सुरू होणार नाही, तोपर्यंत शाळा उघडणार नाही, असा पवित्रा पालकांनी घेतला. त्यामुळे दुपारपर्यंत शाळा कुलूपबंदच होती. आमदारांच्या आश्वासनानंतर शाळेचे कुलूप उघडण्यात आले व विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केला. इमारतीचे बांधकाम होईपर्यंत शाळा ग्रामपंचायतीतच भरणार आहे.
आमदारांच्या आश्वासनानंतर कुलूप काढले
शाळेला कुलूप ठोकले असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदार कृष्णा गजबे यांनी शाळेला भेट दिली. इमारतीची समस्या जाणून घेतली. शाळेसाठी वर्गखोल्या बांधून देण्याचे आश्वासन दिले. एवढेच नाही तर वर्गखोली बांधकामाचे भूमिपूजन सुध्दा केले. आमदारांसोबत जि.प. सदस्य मितलेश्वरी खोब्रागडे, सरपंच रामदास श्रीरामे, ईश्वर पासेवार, नंदू पेटेवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष टिकाराम नारनवरे उपस्थित होते.