मातीच्या घरट्यात लक्ष्मी पक्ष्यांनी थाटला संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:33 PM2019-04-28T23:33:27+5:302019-04-28T23:36:29+5:30

काड्या व गवतापासून पक्ष्यांनी तयार केलेली घरटी सर्वांनीच बघितली आहेत. पोपट, घुबड, पिंजरा यासारखे पक्षी झाडाच्या बुंद्याच्या छिद्रात घरटे करतात. मातीपासून घरटे तयार करणारा पक्षी आजपर्यंत कुणी बघितला नसेल किंवा ऐकण्यातही आला नसेल.

In the clay nest, Lakshmi birds have fallen in the world | मातीच्या घरट्यात लक्ष्मी पक्ष्यांनी थाटला संसार

मातीच्या घरट्यात लक्ष्मी पक्ष्यांनी थाटला संसार

googlenewsNext
ठळक मुद्देपक्ष्यांची कला स्थापत्य अभियंत्यालाही लाजवणारी : गाढवी नदीच्या पुलाच्या छताखाली बांधले घरटे

अतुल बुराडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा : काड्या व गवतापासून पक्ष्यांनी तयार केलेली घरटी सर्वांनीच बघितली आहेत. पोपट, घुबड, पिंजरा यासारखे पक्षी झाडाच्या बुंद्याच्या छिद्रात घरटे करतात. मातीपासून घरटे तयार करणारा पक्षी आजपर्यंत कुणी बघितला नसेल किंवा ऐकण्यातही आला नसेल. मात्र देसाईगंज तालुक्यातील विसोरा ते शंकरपूर गावादरम्यान वाहणाऱ्या गाढवी नदीवरील पुलाच्या छताखालच्या बाजूस शेकडोच्या संख्येत असलेल्या लक्ष्मी नावाच्या पक्ष्यांनी मातीपासून घरटे तयार केले आहे. सदर घरटे अगदी वारूळाप्रमाणे दिसते. मात्र या घरट्यांमधून पक्षी बाहेर येत असताना बघून पाहणारा व्यक्ती अचंबीत होतो.
अन्न, निवारा व रोजगार ज्या ठिकाणी मिळेल, त्या गावाला आपले गाव समजून माणूस त्या गावात वास्तव्यास राहतो. या तीन गोष्टींसाठी माणूस स्थलांतरीत होतो. यापासून पक्षीही अपवाद नाही. ज्या ठिकाणी आल्हाददायक वातावरण, चारा व पाणी मिळेल, त्याच ठिकाणी ते आपले घरटे उभारतात. यासाठी काही पक्षी हजारो किलोमीटर अंतरावर स्थलांतरीत होतात. लक्ष्मी पक्ष्यांनीही या तीन बाबी एकाच ठिकाणी मिळतील, अशा ठिकाणाचा शोध घेतला असावा. त्यामध्ये गाढवी नदीवरील पुलाचे ठिकाण त्यांच्यासाठी योग्य वाटले असावे. खालून नदीचे पाणी वाहत असल्याने थंडावा राहतो. तसेच हिरवागार परिसर असल्याने चाºयाचीही समस्या नाही.
मात्र घरटे बांधण्याची समस्या होती. पक्ष्यांनी यावरही उपाय शोधला आहे. पुलाच्या छताखाली मातीचे घरटे तयार केले आहेत. मातीचे घरटे तयार करणारे एकमेव लक्ष्मी पक्षी असावे, असा अंदाज पक्षीतज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. विशेष म्हणजे, एकमेकांना घरटी लागून असल्याने घरट्यांची जागा एखाद्या वारूळाप्रमाणे दिसून येते. लक्ष्मी पक्षी घरट्याच्या गोलाकार छिद्रातून सतत आतबाहेर येत असल्याचे दिसून येतात.
कोणीही जवळ आल्याचे लक्षात येताच घरट्याबाहेर निघून घिरट्या मारण्यास सुरूवात करतात. पुलाच्या दोन्ही बाजुला नजर टाकल्यास हे पक्षी दिसून येतात. मात्र पक्ष्यांनी घरटी बघायची असल्यास नदी पात्रात उतरून बघावे लागते.
बदलत्या परिस्थितीला जुळवून घेण्यासाठी मानवाने अनेक शोध लावले आहेत. जंगल नष्ट होत चालले आहे. नदी, नाले उन्हाळ्यापूर्वीच आटायला लागले आहेत. त्यामुळे पक्ष्यांना निवाºयाचा प्रश्न निर्माण झाला असावा. त्यामुळे या पक्ष्यांनी मातीचे घरटे बनविण्याचा नवीन शोध लावला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पक्ष्यांनी बांधलेले घरटे पुलाचा पिल्लर व छताला चिकटून आहेत. पुलाचे छत काही प्रमाणात बाहेर आले असल्याने पावसाची झडप घरट्यांना लागत नाही.
पावसाच्या पाण्यामुळे घरट्यांचे संरक्षण होते. घरट्यांची बांधणी बघितली तर एखाद्या स्थापत्य अभियंत्यालाही लाजवेल, अशी आहे. त्यांच्या जगण्याची जिद्द व संघर्ष मानवासाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
असा आहे लक्ष्मी पक्षी
लक्ष्मी हा चिमणीच्या आकाराचा पक्षी आहे. त्याचे डोके व शरीर काळ्या पिसांनी आच्छादले आहे. पाठीवर पुसटसा पांढरा पट्टा दिसून येतो. पंख काळेभोर आहेत. गळ्यापासून पोटाखालच्या भागावर पुसटशा काळ्या रंगाच्या रेषा दिसून येतात. त्यात पांढरा रंग अधिक आहे. सदर पक्षी पुलाच्या खाली राहतात. त्यामुळे त्यांचा मानवाशी संबंध फारसा येत नाही. परिणामी एखादा व्यक्ती पुलाखाली गेल्यास पक्षी भयभीत होऊन ओरडत घिरट्या मारण्यास सुरूवात करतात. एका सेकंदासाठी घरट्यात जाऊन पुन्हा बाहेर पडतात. जोपर्यंत व्यक्ती निघून जात नाही, तोपर्यंत पक्षांची धावपळ सुरू राहते.
चामोर्शी-मूल मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर अशाच प्रकारच्या लक्ष्मी पक्ष्यांनी घरटे बांधले आहेत. या ठिकाणी हजारोच्या संख्येत पक्ष्यांची घरटी आहेत.

Web Title: In the clay nest, Lakshmi birds have fallen in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.