शौचालयांची स्वच्छता करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:24 AM2021-07-08T04:24:29+5:302021-07-08T04:24:29+5:30

देसाईगंज : शासकीय कार्यालयांच्या शौचालयात मोठी दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. या शौचालयांची ...

Clean the toilets | शौचालयांची स्वच्छता करा

शौचालयांची स्वच्छता करा

Next

देसाईगंज : शासकीय कार्यालयांच्या शौचालयात मोठी दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. या शौचालयांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

औद्योगिक वसाहती स्थापन करा

गडचिरोली : जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्यासाठी धानाेरा, कुरखेडा येथे औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गोगावजवळ ब्रेकर द्या

गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावर भरधाव वाहतूक होत असल्याने गोगाव येथील बसथांब्यावर गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गतिरोधक अभावी या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत.

वराहांचा बंदोबस्त करा

गडचिरोली : स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सन २०१७, २०१८ व २०१९ या वर्षात तीनदा मोकाट वराह पकडण्याची मोहीम राबविण्यात आली. मात्र, पुन्हा शहराच्या विविध भागात मोकाट वराहांचा हैैदोस वाढला आहे. पालिकेने वराह पकडावे.

अहेरीत पसरली घाण

अहेरी : स्थानिक नगरपंचायत स्वच्छता बाबत फारशी आग्रही नाही. अनेक ठिकाणी नाल्यांचे बांधकाम अपूर्ण आहे. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहताना दिसून येत आहे. अहेरी नगरपंचायतीची स्थापना २३ एप्रिल २०१५ रोजी झाली.

परवानगी न घेताच घरांचे बांधकाम वाढले

गडचिराेली : नगरपरिषद क्षेत्रात घराचे बांधकाम करायचे असेल तर नगरपरिषदेकडून रितसर परवानगी घ्यावी लागते. मात्र, शहरातील बहुतांश घरमालक नगरपरिषदेकडे परवानगी न घेताच घरांचे बांधकाम करत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. नगरपरिषदेने कारवाई करण्याची गरज आहे.

सिराेंचा - आसरअल्ली मार्गाची दुर्दशा

सिरोंचा : सिरोंचा-आसरअल्ली या राष्ट्रीय महामार्गाचे काम काही वर्षांपूर्वी झाले होते ; परंतु जड वाहतुकीमुळे या रस्त्याची वाट लागली. सध्या ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाल्याने यामार्गे आवागमन करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी या मार्गाची दुरुस्ती केली जाते.

पळसगाव जवळ उंच पूल बांधण्याची मागणी

जोगीसाखरा : जोगीसाखरा ते पळसगाव मार्गावर ३५ वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले; परंतु सदर पूल ठेंगणा आहे. पावसाळ्यात येथून पुराचे पाणी वाहत असते. त्यामुळे मार्गावरील वाहतूक अनेकदा ठप्प होते. या ठिकाणी उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी जोगीसाखरा व पळसगाव येथील नागरिकांनी केली आहे.

खड्ड्यांमुळे प्रवाशांना २५ किमीचा फेरा

अहेरी : अहेरी-कन्नेपल्ली मार्गावर खड्डे पडल्याने या मार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, मार्गाच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अहेरी-कन्नेपल्ली मार्ग सोयीचा आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासकीय यंत्रणेकडून कार्यवाही हाेत नसल्याचे दिसून येते.

भिवापूर-आमगाव मार्गाची दुर्दशा

चामोर्शी : तालुक्यातील भिवापूर क्रॉसिंग-आमगाव (महल)-नेताजीनगर हा १५ किमीचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. डांबर निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होत असल्याने सदर मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे. प्रशासनाने ठाेस नियाेजन करून या मार्गाची पक्की दुरूस्ती करावी, अशी मागणी हाेत आहे.

खासगी वाहनांकडून नियमांचे उल्लंघन

कुरखेडा : शासनाच्या नियमानुसार एसटीच्या बस थांब्यापासून २०० मीटर अंतरावर खासगी वाहनांना उभे ठेवून प्रवासी भरण्यास बंदी असली तरी कुरखेडा येथे या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. अतिक्रमणांमुळे शहरामध्ये वाहतुकीची कोंडी होत आहे.

आरमाेरीत पार्किंगच्या व्यवस्थेचा अभाव

आरमाेरी : शहरातील मुख्य चौकात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यावरच वाहने ठेवतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असून अपघाताची शक्यताही वाढली आहे. नगरपरिषदेने या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी आहे. विशेष म्हणजे काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे.

अपंग विवाह अनुदान योजनेची जागृती करा

आष्टी : संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्यावतीने अपंग युवक, युवतींसाठी कल्याण विवाह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत अपंग कल्याण विवाह योजना राबविली जाते. मात्र, या योजनेची जनजागृती करण्यात येत नसल्याने अनेक अपंग युवक, युवती योजनेबाबत अनभिज्ञ आहेत.

व्यावसायिकांमुळे वाहतुकीला अडथळा

गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात मुख्य मार्गाच्या कडेला अनेक किरकोळ दुकानदार दिवसभर हातगाडी लावून विविध साहित्य विकत असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. गांधी चाैकात सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास दुचाकी व हातठेल्यांची गर्दी असते. पालिका प्रशासन कारवाईबाबत सुस्त असल्याचे दिसून येते. वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.

वनविभागावर वाढला रिक्त पदांचा भार

गडचिराेली : जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८० टक्के क्षेत्रफळ जंगलाने व्यापले आहे. यासाठी संपूर्ण जिल्हाभरात २ हजारपेक्षा अधिक वनकर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत चालला असून, लाकूड तस्करी थांबविणे अशक्य झाले आहे.

डास व कीटकांमुळे आरोग्य धोक्यात

एटापल्ली : शहरातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपनस्पेसही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी, डास व कीटकांची उत्पत्ती होत आहे. आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपरिषदेने फवारणी करून डास व कीटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.

मोहझरीतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे

गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी गावातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. सदर रस्ते दुरुस्त करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. मोहझरी गावातील मुख्य मार्ग डांबरीकरणाने बनला आहे; मात्र मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

डुकरांच्या बंदोबस्ताकडे पालिकेचे दुर्लक्ष

गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वॉर्डात डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे; मात्र पालिकेच्यावतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंड बस्त्यात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाचे डुकराच्या हैदोसाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.

शाळा आवारात जनावरांचा वावर

आलापल्ली : अहेरी पंचायत समिती अंतर्गत दुर्गम गावांतील जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना अद्यापही पक्क्या स्वरूपाची संरक्षक भिंत उभारण्यात आली नाही तसेच अनेक शाळांना प्रवेशद्वार उभारले नाही. परिणामी, गावातील मोकाट जनावरे शाळा परिसरात जाऊन हैदोस घालत आहेत.

कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करा

आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी हाेत आहे.

हेमाडपंथी शिवमंदिर जीर्णावस्थेत

गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिवमंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंथी आहे. या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे, तसेच मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. सदर मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते, असे सांगितले जाते. या मंदिरातून भुयार जात असून, ते भुयार वैरागड येथील किल्ल्यामध्ये निघते, अशी आख्यायिका आहे.

झुडूपी जंगल शेतीसाठी उपलब्ध करा

गडचिरोली : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झुडूपी जंगल आहे. सदर जंगल शेतकऱ्यांना शेतजमिनीसाठी उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. वाढत्या लोकसंख्येबरोबरच जमिनीचे तुकडेही वाढत चालले आहेत.

प्रसाधनगृहाअभावी महिलांची कुचंबणा

चामाेर्शी : ग्रामीण भागातील काही प्रवासी निवाऱ्याजवळ प्रसाधनगृह नसल्याने तसेच ज्या ठिकाणी आहे तिथे सर्वत्र अस्वच्छता असल्याने महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित गावातील ग्रामपंचायतींनी याकडे लक्ष देऊन आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी अपेक्षा केली जात आहे.

आवश्यकतेच्या ठिकाणी विद्युत खांब द्या

धानोरा : तालुक्यातील चव्हेला, मुंगनेर येथे वाढीव विद्युत खांब लावून वीजपुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष आहे.

Web Title: Clean the toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.