सफाई कर्मचारी हक्कांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:44 AM2018-04-19T01:44:17+5:302018-04-19T01:44:17+5:30
गडचिरोली नगर परिषदेत एकूण २७ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र या सफाई कर्मचाऱ्यांना नगर परिषद त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवत आहे, असा आरोप अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटना जिल्हा गडचिरोलीचे अध्यक्ष छगन महातो यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेत एकूण २७ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र या सफाई कर्मचाऱ्यांना नगर परिषद त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवत आहे, असा आरोप अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटना जिल्हा गडचिरोलीचे अध्यक्ष छगन महातो यांनी केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या १ डिसेंबर १९९० च्या शासन निर्णयानुसार स्थायी महिला सफाई कर्मचाºयांना तीन साड्या, तीन पेटीकोट, तीन ब्लाऊज, चप्पल, पुरूष कर्मचाऱ्यांना टेरिकॉटचे तीन पॅन्ट, तीन शर्ट, हातमोजे, लांब बुट व सफाई कामाचे साहित्य देण्याचे प्रावधान आहे. मात्र गडचिरोली नगर परिषद यापूर्वी हे सर्व साहित्य देत नव्हते. १२ जून २०१७ रोजी सफाई कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे कामबंद आंदोलन केल्यानंतर नगर परिषदेने चार लाख रूपयांचा निधी मंजूर केला. मात्र महिला सफाई कर्मचाऱ्यांना केवळ ३०० रूपये किंमतीची साडी दिली आहे. सदर साडी ९०० रूपयांची असल्याचे सांगितले जात आहे. काही साड्या फाटल्या आहेत. वास्तविक शासकीय गणवेशामध्ये मोडेल, अशी साडी देणे आवश्यक असतानाही घरगुती वापराची साडी दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत कामगारांना मोफत सदनिका देण्याचा निर्णय असूनही नगर परिषदेने कारवाई केली नाही. याबाबत नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी व अभियंता यांना विचारणा केल्यास आपल्याकडे वेळ नसल्याचे सांगून टाळाटाळ करीत आहेत. यावरून नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी सफाई कामगारांचे प्रश्न सोडविण्यास फारसे गंभीर नसल्याचा आरोप केला आहे.
कंत्राटी तत्त्वावर जवळपास १०० सफाई कामगार कार्यरत आहेत. या कामगारांना मागील तीन महिन्यांपासून मजुरी देण्यात आली नाही, अशी माहिती महाते यांनी दिली. पत्रकार परिषदेला संघटनेचे उपाध्यक्ष योगेश सोनवाने, सहसचिव प्रितम राणे, तालुका संघटिका नितेश सोनवाने, राकेश शिलेदार, शोभा शिलेदार हजर होते.