सफाई मजदूर काँग्रेसचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 01:26 AM2017-08-10T01:26:16+5:302017-08-10T01:26:47+5:30
रोजंदारी कामगार, कंत्राटी कामगार, स्थायी सफाई कामगारांच्या समस्या निकाली काढण्यात याव्या या तसेच अन्य मागण्यांसाठी....
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रोजंदारी कामगार, कंत्राटी कामगार, स्थायी सफाई कामगारांच्या समस्या निकाली काढण्यात याव्या या तसेच अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेसच्या वतीने बुधवारी क्रांतीदिनी गडचिरोली नगर परिषदेसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टांक यांच्या नेतृत्वात सफाई कामगारांच्या समस्यांबाबत शासनास अवगत करण्यात आले होते. मात्र शासनाने आजपर्यंत सफाई कामगारांच्या समस्या निकाली काढल्या नाहीत. गडचिरोली नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. संघटनेमार्फत १२ जून २०१७ रोजी दिलेल्या निवेदनानुसार कामगार आयुक्तांनी दिलेल्या पत्रान्वये ८ हजार ४३८ रुपये प्रतीमाह वेतन देण्यात यावे, रोजंदारी कामगारांचे नगर परिषदेकडून प्रतीमाह होणारी इपीएफ कपातीची माहिती पुराव्यासह कामगारांना देण्यात यावी, १९९३ पुर्वीपासून रोजंदारी तत्वावर कार्यरत कामगारांना पागे लाड समितीप्रमाणे वारसा हक्क लागू करण्यासाठी प्रस्ताव संचालकांना पाठविण्यात यावे, अर्धदिवस काम केलेल्या कामगारांची पुर्ण दिवसांची गैरहजेरी लावून कामगारांचे आर्थिक नुकसान करणार्या कर्मचाºयांवर कारवाई करावी, डॉ. बाबासाहेब श्रमसाफल्य घरकुल योजनेचा लाभ २५ वर्ष सेवा झालेल्या सफाई कामगारांच्या वारसदारांना लागू करण्यात यावा आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी छगन महातो उपस्थित होते.