मुलचेरा शहरात स्वच्छतेची ऐसीतैशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:13 AM2019-01-25T00:13:34+5:302019-01-25T00:14:02+5:30
स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या भोंगळ व बेजबाबदार कारभारामुळे मुलचेरा नगर पंचायतीच्या सर्व १७ ही वॉर्डात घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र या गंभीर समस्येकडे नगर पंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुलचेरा : स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या भोंगळ व बेजबाबदार कारभारामुळे मुलचेरा नगर पंचायतीच्या सर्व १७ ही वॉर्डात घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र या गंभीर समस्येकडे नगर पंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
तीन वर्षांपूर्वी मुलचेरा ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा मिळाला. त्यावेळी मुलचेराच्या विकासाला गती मिळेल, अशी आशा नागरिकांमध्ये होती. मात्र ग्रामपंचायतपेक्षाही वाईट अवस्था नगर पंचायतीच्या कार्यकाळात शहराची झाल्याचे दिसून येत आहे.
नगर पंचायतीला स्थायी स्वरूपाचा मुख्याधिकारी अद्यापही मिळालेला नाही. सध्या नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा प्रभार येथील नायब तहसीलदार समशेर खा पठाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मुलचेरा नगर पंचायतीअंतर्गत १४ व्या वित्त आयोगामधून शहरातील सर्व वॉर्डात घनकचरा व्यवस्थापनाची कामे हाती घेण्यात आली. मात्र ही कामे सप्टेंबर २०१८ पासून पूर्णत: बंद आहेत. परिणामी शहरातील सर्वच १७ वॉर्डात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वॉर्डातील नाल्यांची साफसफाई केली जात नाही. राणी दुर्गावती नगरात वॉर्डक क्र.६ मध्ये नाल्यांमध्ये सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. नगर पंचायतीची स्थापना होऊन साडेतीन वर्ष उलटली. मात्र शहरात अद्यापही नगर पंचायतीच्या वतीने डम्पिंग यॉर्ड तयार करण्यात आले नाही. येथील मामा तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम थंडबस्त्यात आहे. परिणामी स्वच्छतेअभावी तलावात दुर्गंधी पसरली आहे. येथील मच्छी मार्केट हटविण्याच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. घणकचरा व्यवस्थापन कामाचे आदेश एप्रिल २०१८ मध्ये संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले.
संबंधित कंत्राटदाराने प्रत्यक्षात जून ते आॅगस्ट २०१८ या तीन महिन्यात स्वच्छतेचे काम केले. मात्र त्यानंतर स्वच्छता व कचरा उचलण्याचे काम पूर्णत: बंद आहे.
शहरातील नाली स्वच्छतेचे कंत्राट झाल्यानंतर नगर पंचायतीने सुधारित दर लागू केले. कमी दरामध्ये कंत्राटदार कामे करीत नसल्यामुळे स्वच्छतेचे काम सप्टेंबर २०१८ पासून बंद आहे. आता नगर पंचायतीची सर्वसाधारण सभा असल्याने या सभेत पदाधिकारी कंत्राटदाराचा कंत्राट रद्द करण्याबाबत निर्णय घेतील.
- समशेर खा पठाण, प्रभारी मुख्याधिकारी, नगर पंचायत, मुलचेरा