गावांमधील स्वच्छतेचे होणार सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 01:17 AM2018-08-06T01:17:25+5:302018-08-06T01:18:14+5:30
जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित करण्यात आल्या आहेत. या गावांमध्ये स्वच्छता शाश्वत राहावी, यासाठी त्रयस्त संस्थेच्या मार्फत मंगळवारी काही निवडक १० ते १५ ग्रामपंचायतींचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित करण्यात आल्या आहेत. या गावांमध्ये स्वच्छता शाश्वत राहावी, यासाठी त्रयस्त संस्थेच्या मार्फत मंगळवारी काही निवडक १० ते १५ ग्रामपंचायतींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. पाच लोकांची टीम सोमवारी सायंकाळी दाखल होणार आहे. सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना २ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीयस्तरावर पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे.
मार्च २०१८ पर्यंत राज्यातील २७ हजार ६६७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित करण्यात आल्या आहेत. काही गावे हागणदारीमुक्त घोषित झाल्यानंतर स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. मात्र स्वच्छता ही केवळ पुरस्कारासाठी नसून चांगल्या व सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे हागणदारीमुक्त घोषित झालेल्या राज्यभरातील ग्रामपंचायतींचे १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षण करणारी टीम गावातील शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्र, सार्वजनिक शौचालये, त्यांचा वापर तपासणार आहे. बाजाराचे ठिकाण, धार्मिक स्थळे, चौक, गावठाण, परिसरातील सांडपाणी, घनकचऱ्याचे व्यवस्थापन आदी बाबी तपासणार आहे. वरील स्थळांना भेट देऊन गावपातळीवरील प्रभावी व्यक्ती, शिक्षक, सरपंच, ग्रामसेवक, ग्रा.पं.सदस्य, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, अंगणवाडी कार्यकर्ता, आशा यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन माहिती जाणून घेणार आहे.
स्वच्छता सेवा स्तराच्या प्रगतीच्या आधारे ३५ टक्के गुण दिले जातील. सार्वजनिक ठिकाणी पाण्याची उपलब्धता यावर ३० टक्के गुण व नागरिकांच्या मुलाखतीतून मिळणाºया माहितीच्या आधारे ३५ टक्के गुण दिले जाणार आहेत.
राज्यातील ३४ जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे सर्वेक्षण होणार आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीला भेट देणे शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील १० ते १६ ग्रामपंचायतींची नमूना पद्धतीने निवड करून सर्वेक्षण होणार आहे.
मंगळवारी सर्वेक्षण; प्रशासनाची तारांबळ
ग्रामपंचायतींचे सर्वेक्षण १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत केले जाणार होते. गडचिरोली हा राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेला मागास जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात सर्वेक्षण करणारी समिती आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येईल, असा अंदाज बांधला होता. त्यादृष्टीने प्रशासन अगदी संथगतीने तयारी करीत होते. मात्र समिती सदस्य सोमवारी सायंकाळी गडचिरोली येथे दाखल होणार आहेत व मंगळवारपासून निवडक ग्रामपंचायतींचे सर्वेक्षण करणार आहेत. विशेष म्हणजे कोणत्या ग्रामपंचायतीचे सर्वेक्षण केले जातील, याची माहिती समिती सदस्यांनाही नाही. मंगळवारी वेळेवर दिल्लीवरून निवडक गावांची यादी पाठविली जाईल, त्या गावांना समिती भेट देईल. एकंदरीतच निवडलेल्या गावांची नावे पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहेत. ऐन वेळेवर समिती येणार असल्याने जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. काही ग्रामपंचायतींना याबाबतची माहिती सुद्धा नाही.
असे राहील गुणांकण
सर्वेक्षण करणारे समिती सदस्य गावातील स्वच्छतेची पाहणी करतील. त्याचबरोबर स्वच्छतेबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतली. एकूण १०० गुण राहणार आहेत. यामध्ये सार्वजनिक जागेवरील स्वच्छतेला ३० टक्के गुण राहतील. यामध्ये शौचालय उपलब्धतता ५ गुण, शौचालय वापर ५ गुण, कचºयाचे व्यवस्थापन १० गुण, सांडपाणी व्यवस्थापन १० गुण राहतील. गावातील नागरिकांची स्वच्छतेबाबतची माहिती, मते व अभिप्राय यावर टक्के ३५ गुण आहेत. यामध्ये जाणीव जागृती २० गुण, नागरिकांचे आॅनलाईन अभिप्राय ५ गुण, प्रभावी व्यक्तींच्या अभिप्राय याला १० गुण राहतील. स्वच्छतेसंबंधी मानकांची जिल्ह्याने व राज्याने केलेल्या प्रगतीला ३५ टक्के गुण राहतील. यामध्ये स्वच्छतेचे प्रमाण ५ गुण, जिल्ह्याची हागणदारी मुक्तीची टक्केवारी ५ गुण, जिल्ह्याची हागणदारीमुक्त पडताळणी टक्केवारी १० गुण, फोटो अपलोडिंग ५ गुण व नादुरूस्त शौचालय उपलब्धता याला १० गुण दिले जाणार आहेत.