आॅनलाईन परीक्षा पद्धत बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 01:11 AM2018-02-08T01:11:55+5:302018-02-08T01:13:39+5:30
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने ३५ व्यवसाय प्रशिक्षणार्थ्यांची सेमिस्टर परीक्षा आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. आयटीआयच्या प्रत्येक विद्यार्थ्याला संगणकाचे ज्ञान असणारच असे नाही.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने ३५ व्यवसाय प्रशिक्षणार्थ्यांची सेमिस्टर परीक्षा आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. आयटीआयच्या प्रत्येक विद्यार्थ्याला संगणकाचे ज्ञान असणारच असे नाही. त्यामुळे आयटीआयच्या विद्यार्थ्यांची आॅनलाईन परीक्षा रद्द करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
जिल्हाधिकाºयांमार्फत पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आयटीआयच्या प्रशिक्षणार्थ्यांची सेमिस्टर सैद्धांतिक परीक्षा ओएमआर सिटचा वापर करून ५ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. परंतु याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. या परीक्षेच्या स्वरूपाबाबत प्रशिक्षणार्थी अनभिज्ञ आहेत. प्रशिक्षणार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या परीक्षेबाबत अचानक निर्णय आल्याने प्रशिक्षणार्थी भयभित झाले आहेत. पूर्व सूचना न देता व पूर्व तयारी न करता शेवटच्या क्षणी सेमिस्टरच्या आॅनलाईन परीक्षा पद्धतीमुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ उडण्याची शक्यता आहे. आयटीआय अंतर्गत अनेक प्रशिक्षणार्थी दहावी उत्तीर्ण असतात तर काही प्रशिक्षणार्थी दहावी अनुत्तीर्ण असतात. त्यामुळे प्रत्येकच विद्यार्थ्याला संगणकाचे ज्ञान असेलच असे नाही. संगणकाचे ज्ञान असेल तरीसुद्धा एकाएकी निर्णय घेऊन विद्यार्थ्यांवर आॅनलाईन परीक्षा थोपविण्याचे काम व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने केले आहे. त्यामुळे आयटीआय प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचा विचार करून आॅनलाई परीक्षा बंदी करावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी स्वीकारले. निवेदन देताना आयटीव्हीओ कार्यकर्ते विनोद मडावी, अंकूश कोकोडे, अधिर गेडाम, पीतांबर हरो, शरद वेलादी, राहूल पेंदाम, सावन चिकराम, शेषराव गावडे, रत्नमाला आत्राम, शीतल पेंदाम, स्वाती कोडाप, पूजा उईके व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परीक्षा धोरणात विसंगतीचा आरोप
एकाच व्यवसायाच्या सेमिस्टरच्या प्रशिक्षणार्थ्यांची परीक्षा जिल्हा केंद्रावर आॅनलाईन पद्धतीने व तालुका केंद्रावर ओएमआर शिटचा वापर करून आॅफलाईन पद्धतीने घेणे हे धोरण विसंगत व समान न्याय व्यवस्थेत भेदभावपूर्ण असल्याची भावना प्रशिक्षणार्थ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे परीक्षा स्वरूपात बदल करीत असताना तज्ज्ञ समिती नेमून प्रशिक्षणार्थ्यांचा शैक्षणिक स्तर, प्रशिक्षणार्थ्यांस स्तर पारदर्शकता आदी बाबींचा विचार करून परीक्षा द्यावी, आॅनलाईन परीक्षा बंद करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.