तीन वर्षांपासून पाणी योजना बंद
By admin | Published: May 23, 2017 12:40 AM2017-05-23T00:40:00+5:302017-05-23T00:40:00+5:30
येथील नळी पाणी पुरवठा योजना मागील तीन वर्षांपासून बंद आहे.
पातळी खालावली : भामरागडात पाणी टंचाईची समस्या तीव्र
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : येथील नळी पाणी पुरवठा योजना मागील तीन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे भामरागड येथे पाणी टंचाईचे सावट तीव्र झाले असतानाही नगर पंचायतीचे पाणी पुरवठा योजना दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत चालेले आहे.
भामरागड या तालुका स्थळाच्या सभोवताल पामुलगौतम, इंद्रावती व पर्लकोटा या नद्यांचा वेढा आहे. त्यामुळे नदीतील पाण्याची या शहराला कमतरता भासत नाही. सुमारे १० वर्षांपूर्वी या भामरागड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम करण्यात आले. मात्र तीन वर्षांपूर्वी या योजनेत काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला. तेव्हापासून सदर योजन बंद आहे. ही योजना दुरूस्तीसाठी नगर पंचायतीने कोणतेही पाऊल उचलले नाही. परिणामी भामरागड शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी पुरवठा योजना दुरूस्त करण्यासाठी जास्त निधीची आवश्यकता असल्याने लोेकप्रतिनिधींनी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी होत आहे.
भामरागड तालुक्यात सुमारे १२० गावे आहेत. यातील बहुतांश गावांमध्ये हातपंप व विहीर हेच पाण्याचे साधन आहे. मात्र दुर्गम भागातील हातपंप व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. भामरागड तालुक्यातील ९० टक्के जनता शेती हाच व्यवसाय करते. प्रत्येक शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. या पशुधनाला चरण्यासाठी जंगलात सोडले जाते. पाळीव जनावरे गावासभोवताल असलेल्या मामा तलावाचे पाणी पिऊन येत होते. आता मात्र तलाव व बोड्या आटल्याने जनावरांना बाहेर पाणी मिळत नाही. परिणामी त्यांना घरीच पाणी पाजावे लागते. त्यामुळेही पाणी संकट तीव्र झाले आहे. नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.