जिल्ह्यातील १६ पाणी पुरवठा योजना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 10:31 PM2019-04-01T22:31:44+5:302019-04-01T22:32:17+5:30
गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर एकूण २२७ नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र यापैकी विविध कारणांमुळे तब्बल १६ नळ पाणी पुरवठा योजना बंद आहेत. परिणामी नळ योजनेच्या हद्दितील जवळपास ३५ वर गावांमध्ये ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांना पाण्यासाठी हातपंप व सार्वजनिक विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे.
दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर एकूण २२७ नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र यापैकी विविध कारणांमुळे तब्बल १६ नळ पाणी पुरवठा योजना बंद आहेत. परिणामी नळ योजनेच्या हद्दितील जवळपास ३५ वर गावांमध्ये ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांना पाण्यासाठी हातपंप व सार्वजनिक विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे.
महाराष्टÑ जीवन प्राधिकरण अंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै., अहेरी तालुक्यातील लगामबोरी, देसाईगंज तालुक्यातील पोटगाव व अहेरी शहरात मिळून एकूण चार मोठ्या नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या चारही पाणी पुरवठा योजना सुरू आहेत. जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत अनेक वर्षांपूर्वी ग्रामपंचायतस्तरावर एकूण २२७ नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आले आहे. या नळ योजनेच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदार स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनावर आहे. नळ पाणी पुरवठा करण्यासाठीची मोटार तसेच वीज पुरवठा व इतर बाबी योग्यस्थितीत ठेवणे ही सर्व कामे ग्रामपंचायतीला करावी लागतात. मात्र जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतीचे या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने तसेच ग्रामपंचायतीचे आर्थिक नियोजन ढासळल्याने या १६ योजना अनेक दिवसांपासून बंद पडल्या आहेत. परिणामी या गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बंद असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांमध्ये अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, कमलापूर, चिंतलपेठ, राजाराम आदी चार योजनांचा समावेश आहे.
भामरागड तालुक्यातील लाहेरी ही नळ योजना बंद आहे. गडचिरोली तालुक्यातील नगरी, बामणी, चामोर्शी तालुक्यातील कानोली, देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा, एटापल्ली तालुक्यातील गेदा, मुलचेरा तालुक्यातील येल्ला, विवेकानंदपूर आदी नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे. सिरोंचा तालुक्यातील गुमलकोंडा, जाफ्राबाद, कोर्ला व नारायणपूर या चार पाणी योजना बंद आहेत.
वीज पुरवठ्याचे बिल थकल्याने महावितरणने वीज पुरवठा खंडीत केला. त्यामुळे १० नळ योजना बंद झाल्या आहेत. तर इतर सहा पाणी योजना इतर कारणाने बंद आहेत. नळ योजना बसविलेल्या नदीची पाणी पातळी खालावल्यामुळे नदी काठावर बसविण्यात आलेल्या मोठ्या टाकीत पाणी खेचण्याची प्रक्रिया बंद झाली आहे. एकूणच ग्रामपंचायतीच्या भोंगळ काराभारामुळे १६ पाणी योजना बंद आहेत.
मे महिन्यात पाणी संकट तीव्र होणार
तब्बल १६ पाणी योजना बंद असलेल्या जवळपास ३० गावांमध्ये हातपंप, सार्वजनिक विहीर तसेच तलाव, बोड्या आदी पाणी स्त्रोत उपलब्ध आहे. आता एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकत असल्यामुळे नदी नाल्यातील पाणी तळाशी गेले आहे. विहीर व हातपंपाची पाणी पातळी आता झपाट्याने खालावत आहे. मे महिन्यात कडक उन्हाळा सुरू होणार असल्याने गावातील हातपंप व विहिरी निकामी ठरणार आहेत. परिणामी नळ योजना बंद असलेल्या या गावांमध्ये मे महिन्यात पाणी संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
२०० फूट खोलीवर असतो सार्वजनिक हातपंप
बहुतांश नागरिक आपल्या घरी पाणी पुरवठ्याची सुविधा करण्यासाठी खासगी हातपंप बसवतात. मात्र हे हातपंप १०० ते १२५ खोल फूट मारले जाते. त्यामुळेच याचा खर्च ५० ते ६० हजारांच्या आसपास येतो. मात्र ग्रामपंचायतीच्या वतीने बसविण्यात येणारा सार्वजनिक हातपंप हा २०० फूट खोलवर खोदला जातो. सदर हातपंपाची खोली ६० मीटरवर असायला हवी. तशा मार्गदर्शक सूचनाही संचालनालय, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा महाराष्टÑ राज्य, पुणे यांनी दिल्या आहे. त्यामुळे ६० मीटर खोल हातपंप बसविण्यासाठी दीड लाख रुपये खर्च येतो. संचालनालयाने १ लाख ४० रुपये इतकी खर्च मर्यादा प्रत्येक सार्वजनिक हातपंप बसविण्यावर मंजूर केली आहे.