Lok Sabha Election 2019; अडपल्ली व विसापूर केंद्रावर उडाला गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:32 AM2019-04-12T00:32:43+5:302019-04-12T00:34:10+5:30
प्रशासनाच्या तांत्रिक चुकांमुळे गडचिरोली शहरानजीकच्या अडपल्ली येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या १० क्रमांकाच्या केंद्रावर प्रात्यक्षिकाचे मत गृहित धरल्याने एकूण मतदानाच्या आकड्यात फरक आढळून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रशासनाच्या तांत्रिक चुकांमुळे गडचिरोली शहरानजीकच्या अडपल्ली येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या १० क्रमांकाच्या केंद्रावर प्रात्यक्षिकाचे मत गृहित धरल्याने एकूण मतदानाच्या आकड्यात फरक आढळून आला. त्यामुळे या बुथावरील पक्षांच्या प्रतिनिधींसह मतदारांमध्ये काही वेळ गोंंधळ निर्माण झाला. तसेच गडचिरोली शहरातील विसापूर येथील वीर बाबुराव शेडमाके नगर परिषद शाळेच्या केंद्र क्रमांक ११८ मध्ये ईव्हीएम गतीने काम करीत नसल्याने ४० वर मतदार मतदान न करता घरी परत गेल्याची माहिती आहे.
अडपल्लीच्या केंद्र सकाळी ७.०० वाजता मतदानाची प्रकिया सुरू करण्यात आली. ८.३० वाजतापर्यंत १८ ते १९ मतदारांनी मतदान केले. मात्र यावेळी तपासणी केली असता, मतदानाचा एकूण आकडा ७१ दाखविल्या जात होता. काही लोकांनी ओरड केल्यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी प्रात्यक्षिकाचे ५० मते त्यात मिसळल्याचे झोनल अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर जवळपास १ तास या केंद्रावर मतदानाची प्रक्रिया बंद पडली. त्यानंतर काही वेळाने मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरू झाली. दरम्यान मतदारांची लांबच्या लांब रांग लागली होती.
विसापूर येथील वीर बाबुराव शेडमाके न. प. शाळेच्या केंद्रावर ईव्हीएमची गती कमी असल्याने मतदारांची रांग कमी होत नव्हती. त्यामुळे काही मतदार त्रासून मतदान न करता घरी परतले. ३ वाजतानंतरही या केंद्रावर मतदानाची रांग कायम होती. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराप्रति या केंद्रावरील अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली. विसापूर न. प. शाळेच्या केंद्रावर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट अतिशय संथगतीने काम करीत असल्याने या केंद्रावर सायंकाळी ५ वाजतानंतरही मतदारांची रांग होती. येथे ५.३० वाजतापर्यंत मतदानाची प्रक्रिया चालली.
अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा येथील मतदान केंद्रावर एकूण १ हजार ९३ मतदारांपैकी ८२४ मतदारांनी मतदान केले. यामध्ये ४१५ पुरूष व ४०९ महिला मतदारांचा समावेश आहे. या केंद्रावर ७५.३९ टक्के मतदान झाले.
अहेरी येथील १४३ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर दुपारी १ वाजेपर्यंत ३७ टक्के तर केंद्र क्रमांक १४२ वर ३४.६६ टक्के मतदान झाले.
गुड्डीगुडम येथील केंद्र क्रमांक १६१ वर एकूण ८२७ मतदार होते. त्यापैकी ६२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ३२५ पुरूष व ३११ महिला मतदारांचा समावेश आहे. या ठिकाणी नवीन मतदारांनी उत्साहात मतदान केले.
पेरमिली परिसरात एकूण ११ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. सदर अकराही मतदान केंद्र अतिसंवेदनशील भागात होते. तरीसुद्धा मतदारांनी येथे चांगला प्रतिसाद दिला. पेरमिली येथील बुथ क्रमांक १ वर ७४.८ टक्के, पेरमिली केंद्र क्रमांक २ वर ७५.६६ टक्के, कोरेली बू. केंद्रावर ६८.१२ टक्के, येरमनार येथील केंद्रावर ७२.५१ टक्के, कोडसेपल्ली केंद्रावर ६२.८१ टक्के, चंद्रा येथील केंद्रावर ७९.८६ टक्के, पल्ले येथील केंद्रावर ५७.५६ टक्के, कुरूमपल्ली ६४.५१ टक्के, मेडपल्ली ७८.६४ टक्के, गुर्जा बू. ७६.८४ टक्के व चौडमपल्ली येथील केंद्रावर ७२.१९ टक्के मतदान झाले. सर्व केंद्रावर शांततेत मतदान पार पडले.
चामोर्शी तालुक्याच्या आष्टी येथे पाच केंद्र ठेवण्यात आले होते. या सर्व केंद्रावर मिळून एकूण ५ हजार ७६७ मतदारांपैकी ३ हजार ३०७ मतदारांनी मतदान केले. केंद्र क्रमांक ३२५ वर १ हजार २०८ पैकी ६९४ मतदारांनी मतदान केले. येथील टक्केवारी ५७.४५ आहे. केंद्र क्रमांक ३२६ वर १ हजार २६५ पैकी ७८१ मतदारांनी मतदान केले असून येथील टक्केवारी ६१.७३ आहे. केंद्र क्रमांक ३२७ मध्ये १ हजार ३६९ पैकी ७४१ जणांनी मतदान केले असून याची टक्केवारी ५५.८८ आहे. केंद्र क्रमांक ३२८ मध्ये १ हजार ८० पैकी ५९१ मतदारांनी मतदान केले. याची टक्केवारी ५५ आहे. केंद्र क्रमांक ३२९ केंद्रावर ८४५ पैकी ५०० जणांनी मतदान केले असून येथील टक्केवारी ५९ आहे.
महागाव येथील केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्तात ६७.७३ टक्के मतदान झाले.
सिरोंचा तालुक्याच्या पातागुडम येथील केंद्रावर ७३.९४ टक्के, कोर्लाच्या केंद्रावर ७२.१६ टक्के व रमेशगुडम केंद्रावर ७२.१६ टक्के मतदान झाले. सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात मतदानामध्ये उत्साह दिसून आला.
सिरोंचात यादीत नाव नसल्याने काही मतदारांनी धरला घरचा रस्ता
सिरोंचा नगर पंचायतीच्या हद्दीत सिरोंचा रै. येथे पाच व सिरोंचा माल येथे दोन असे एकूण सात मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. सातपैकी केंद्र क्रमांक २५६, २५८, २५० व २५१ या चार केंद्रावर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात आल्यामुळे मतदान प्रक्रिया संथगतीने पार पडली. प्रचंड विलंब होत असल्याचे पाहून शहरातील काही मतदार मतदान न करता घरी परत गेले. मतदारांमध्ये उत्साह असूनही प्रक्रियेला वेळ लागला.
केंद्र क्रमांक २५६ मधील ईव्हीएम अतिशय संथगतीने काम करीत असल्याचा आरोप या केंद्रावरील मतदारांनी केला. येथील मतदान केंद्रावर पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. मतदान केंद्र परिसरात अपुरी पेंडाल व्यवस्था असल्याने बºयाच मतदारांना उन्हाचे चटके सहन करीत मतदानासाठी प्रतीक्षा करावी लागली. सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक केंद्रांवर दुपारी ३ वाजतानंतरही रांगा कायम होत्या.