गडचिरोलीच्या दुर्गम भागात मुख्यमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी; पोलीस जवानांसह नागरिकांना साहित्य वाटप
By मनोज ताजने | Published: October 25, 2022 03:21 PM2022-10-25T15:21:54+5:302022-10-25T15:23:03+5:30
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते धोडराज पोलीस मदत केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन
भामरागड (गडचिरोली) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (दि.२५) दुपारी भामरागड तालुक्यातील दुर्गम अशा धोडराज पोलीस मदत केंद्राच्या आवारात आदिवासी नागरिक आणि पोलीस जवानांना साहित्य, फटाके आणि फराळ वाटप करून त्यांच्यासोबत संवाद साधत दिवाळी साजरी केली.
नागपूर विमानतळावरून ना. शिंदे हेलिकॉप्टरने थेट धोडराज येथे पोहोचले. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस महासंचालक रजनीश शेठ, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, शिवसेनेचे (बाळासाहेबांची शिवसेना) विदर्भ समन्वयक किरण पांडव आदींनी त्यांचे स्वागत केले.
नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, नक्षलवाद्यांमुळे विकासात्मक कामांत अडथळे येत आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी नक्षलवाद संपवणे गरजेचे आहे. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री असतानाही दुर्गम भागात येत होतो. त्यामुळे तुमच्याबद्दल मला आस्था आहे. तुमच्या विविध समस्यांचीही मला जाणीव आहे. त्या दूर करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील मदतीची भूमिका; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले..
नक्षलविरोधी अभियानासाठी घरापासून शेकडो किलोमीटर लांब राहून आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी-जवानांना घरच्या लोकांसोबत दिवाळी साजरी करता येत नाही. त्यामुळेच त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी मी आलो असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धोडराज पोलीस मदत केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटनही करण्यात आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"