सहकार क्षेत्राला संस्थांनी गतवैभव प्राप्त करून द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 10:21 PM2017-12-23T22:21:26+5:302017-12-23T22:21:42+5:30

सहकारी चळवळीशिवाय राष्ट्र बलशाली होऊ शकत नाही. समाजाने समाजासाठी चालविलेले क्षेत्र म्हणजे सहकार क्षेत्र होय. पण अलिकडे सहकार क्षेत्र संस्थापूजक होण्याऐवजी व्यक्तिपूजक झाल्याने अनेक संस्था डबघाईस आल्या आहेत.

Co-operative sector should get the benefit of the organization | सहकार क्षेत्राला संस्थांनी गतवैभव प्राप्त करून द्यावे

सहकार क्षेत्राला संस्थांनी गतवैभव प्राप्त करून द्यावे

Next
ठळक मुद्देसहकार परिषदेत चरेगावकर यांची अपेक्षा : राज्यभरात ७२ सहकारी संस्था बोगस

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सहकारी चळवळीशिवाय राष्ट्र बलशाली होऊ शकत नाही. समाजाने समाजासाठी चालविलेले क्षेत्र म्हणजे सहकार क्षेत्र होय. पण अलिकडे सहकार क्षेत्र संस्थापूजक होण्याऐवजी व्यक्तिपूजक झाल्याने अनेक संस्था डबघाईस आल्या आहेत. संस्थांनी योग्य तो बदल करून सहकार क्षेत्राला गतवैभव प्राप्त करून द्यावे, अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य सहकार परिषद पुणेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गडचिरोली, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सहकार भारती जिल्हा शाखा व गडचिरोली जिल्हा सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली सहकारी मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात शनिवारी सहकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
या सहकार परिषदेचे उद्घाटन पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खा.अशोक नेते तर प्रमुख अतिथी म्हणून आ. कृष्णा गजबे, आ. डॉ. देवराव होळी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, नगराध्यक्ष योगिता पिपरे, सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, जिल्हा उपनिबंधक सीमा पांडे, प्राचार्य खुशाल वाघरे, रविंद्र भुसारी, सुदर्शन भालेराव, निलकंठ देवांगण प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
यावेळी चरेगावकर पुढे म्हणाले, यासाठी सहकार क्षेत्रात काम करणाऱ्याने व्यक्तीने राजकारण जरूर करावे, पण सहकारात राजकारण आणू नये. राजकारणासाठी सहकाराचा वापर करू नये अशी सूचना त्यांनी केली. राज्यात काही संस्थानी मनमानी करुन सहकारी चळवळ डबघाईस आणली. त्यामुळे २ लाख ३८ हजार संस्थांची चौकशी केली असता ७२ हजार संस्था बोगस निघाल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री आत्राम म्हणाले, प्रगतीच्या वाटेवर या सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे. आपल्या जिल्हयातील सहकारी बँक समृध्द असून ती अशीच अग्रेसर राहण्यासाठी काम करावे असे ते म्हणाले. खा.अशोक नेते, आ.डॉ. देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, रविंद्र भुसारी यांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.
संचालक उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य खुशाल वाघरे, संचालन दिलीप उरकुडे यांनी तर आभार प्रा. शेषराव येलेकर यांनी मानले.
जिल्हा सहकारी बँकेची सेवा आदर्श
कार्यक्रमानंतर शेखर चरेगावकर यांनी जिल्हा बँकेने पटकावलेल्या पुरस्कारांचे आणि सभासदांसाठी राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती देणाºया प्रदर्शनाचे अवलोकन केले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना चरेगावकर यांनी गडचिरोली जिल्हा सहकारी बँकेचे कार्य व प्रगती पाहून आपण प्रभावित झालो असून दुर्गम भागातही या बँकेबद्दल अनेकांकडून चांगल्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अरविंद पोरेड्डीवार यांनी बँकेच्या विस्तारातील अडचणी सांगून त्यावर कशी मात केली हे सांगितले. बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
तंत्रज्ञानाचा स्वीकार करा
सहकारी संस्थांनी समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींसोबत संपर्क वाढविणे गरजेचे आहे. याशिवाय तंत्रज्ञानाशी जवळीकता साधून नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहीजे. शासनाच्या धोरणांचा अभ्यास करा आणि त्यांना सकारात्मक दृष्टीने स्वीकार करावा असे सांगून जगाच्या स्पर्धेत काय केले पाहीजे याचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरतही त्यांनी शेखर चरेगावकर यांनी व्यक्त केली.

Web Title: Co-operative sector should get the benefit of the organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.