मंत्री धर्मरावबाबांसह सहकाऱ्यांना किंमत चुकवावी लागेल; नक्षलवाद्यांकडून धमकी

By संजय तिपाले | Published: July 19, 2023 11:00 PM2023-07-19T23:00:47+5:302023-07-19T23:02:40+5:30

कॉर्पोरेट घराण्यांना पाठिंबा दिल्याबद्दल तीव्र नाराजी

Colleagues including Minister Dharmarao Baba will pay the price; Threat from Naxalites | मंत्री धर्मरावबाबांसह सहकाऱ्यांना किंमत चुकवावी लागेल; नक्षलवाद्यांकडून धमकी

मंत्री धर्मरावबाबांसह सहकाऱ्यांना किंमत चुकवावी लागेल; नक्षलवाद्यांकडून धमकी

googlenewsNext

संजय तिपाले, गडचिरोली: स्थानिक जनता एकीकडे सुरजागड लोहप्रकल्पाला विरोध करत आहे, दुसरीकडे सत्ताधारी प्रकल्पांचा विस्तार करत आहेत. मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे कॉर्पोरेट घराण्यांना पाठींबा देत लोह उत्खननाच्या बाजूने काम करत असल्याचा दावा करुन नक्षल्यांनी याची धर्मरावबाबांसह सहकाऱ्यांना किंमत चुकवावी लागेल, अशी धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अहेरी विधानसभेचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी अलीकडेच अजित पवार यांची साथ देत अन्न व औषध प्रशासन मंत्रीपद मिळवले. कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने दोन पानी पत्रक काढून धर्मरावबाबांना धमकी दिली आहे.

सूरजागड लोहखानीला विरोध अधिक तीव्र करा, असे आवाहन करुन या प्रकल्पासह प्रस्तावित सहा लोह उत्खनन प्रकल्पांविरोधात भूमिका घेतली आहे. उत्खननाच्या सरकार असून या सरकारसोबत गेल्याने धर्मरावबाबा यांच्याविरोधात या पत्रकात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आत्राम आणि त्यांच्या सहकाऱ्याना आदिवासींचे जंगल , जमीन उध्वस्त केल्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही पत्राद्वारे दिला आहे. आत्राम यांनी घराण्यांची दलाली चालविली असल्याचा आरोप करत महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवर तोडगट्टा येथे सुरू असलेले खाणविरोधी आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहनही पत्रकातून केले आहे. दरम्यान, नक्षल्यांच्या या धमकीच्या पत्रकाची पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. नक्षलसप्ताह सुरु असल्याने नक्षल्यांविरोधात मोहीम अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

गडचिरोली जिल्ह्यात दुर्मिळ लोह आहे. अनेक वर्षांनंतर या दुर्गम व मागास जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळत आहे. सूरजागड प्रकल्पामुळे कित्येक स्थानिकांना रोजगार मिळाला, संसार उभे राहिले आहेत. विकासाला प्राधान्य हीच माझी भूमिका आहे. त्यामुळे या धमक्यांकडे मी लक्ष देत नाही. - धर्मरावबाबा आत्राम अन्न व औषध प्रशासन मंत्री

अपहरणाची आठवण....

दरम्यान, १९९० च्या दशकात धर्मरावबाबा आत्राम हे पूर्वीच्या सिरोंचा मतदारसंघाचे आमदार होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते सिरोंचात गेले. यावेळी नक्षल्यांनी त्यांचे सिनेस्टाइल अपहरण केले होते. त्यामुळे संपूर्ण राज्य हादरले होते. तब्बल १५ दिवसांनंतर नक्षल्यांनी त्यांची अटी, शर्थींवर सुटका केली होती. आता या पत्रकामुळे धर्मरावबाबा पुन्हा एकदा नक्षल्यांच्या रडारवर आले असल्याची चर्चा आहे.

 

Web Title: Colleagues including Minister Dharmarao Baba will pay the price; Threat from Naxalites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.