धानोरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:09 AM2021-03-04T05:09:49+5:302021-03-04T05:09:49+5:30
धानोरा - येथे कोरोनाला रोखण्यासाठी नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तीन पथके नेमण्यात आली आहेत. महसूल, पंचायत समिती व ...
धानोरा - येथे कोरोनाला रोखण्यासाठी नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तीन पथके नेमण्यात आली आहेत. महसूल, पंचायत समिती व नगर पंचायतची तीन पथके तैनात असून, विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल केला जात आहे. बुधवार, ३ मार्च रोजी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून एक हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कोरोना विषाणूची लस निघाल्यापासून तसेच नागरिकांचे दैनंदिन व्यवहार पार पडावेत, याकरिता शासनाने काही अटी, शर्तींसह व्यवहार करण्यास सूट दिली. परंतु, नागरिकांनी त्याचा गैरफायदा घेत सैराटपणे वागायला सुरुवात केली. विनामास्क फिरणे, शारीरिक अंतर न पाळणे यामुळे कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने काही जिल्ह्यांत लाॅकडाऊन करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. ती आणखी वाढू नये त्यावर नियंत्रण यावे, याकरिता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक तालुक्यात पथक नेमण्यात आले असून, धानोरा येथे तीन पथके नेमण्यात आली आहेत. महसूल, पंचायत समिती व नगर पंचायतीने तीन पथके नेमून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल केला आहे.
धानोरा शहरात महसूल, पंचायत समिती व नगर पंचायतीची तीन पथके तयार करण्यात येऊन प्रत्येक पथकात दोन पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत. ही पथके दररोज शहरात फिरून लग्न समारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमात गर्दी होणार नाही तसेच शारीरिक अंतर, मास्कचा वापर याकडे कटाक्षाने लक्ष ठेवून आहेत. बुधवारी पंचायत समितीच्या पथकाने शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून १ हजार चारशे रुपयांचा दंड वसूल केला. या पथकात पथकप्रमुख पि. के. घुग्गुस्कर, आर. एस. कुनघाडकर, राजेश दोनाडकर (ग्रामसेवक), पोलीस कर्मचारी दिनदयाल गुरुभेले, देवचंद रतनपुरे यांचा समावेश होता.