जिल्हाधिकाऱ्यांकडून अनलाॅकचे आदेश जाहीर; बाजारपेठ उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 05:00 AM2021-06-07T05:00:00+5:302021-06-07T05:00:27+5:30

स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्था यांच्या बैठका व निवडणुकांबाबत- कोविड-१९ निर्देशांचे अधीन राहून सामाजिक अंतर राखून ५० लोकांच्या मर्यादेत सुरू ठेवण्याची मुभा असेल. सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत प्रत्यक्ष बांधकामस्थळावर कामास मुभा असेल; परंतु कामगारांना दुपारी चार वाजल्यानंतर काम करण्याची परवानगी नसेल. ई-कॉमर्स ‘साहित्य व सेवा’- नियमितपणे सुरू असतील.

Collector announces unlock order; The market will open | जिल्हाधिकाऱ्यांकडून अनलाॅकचे आदेश जाहीर; बाजारपेठ उघडणार

जिल्हाधिकाऱ्यांकडून अनलाॅकचे आदेश जाहीर; बाजारपेठ उघडणार

Next
ठळक मुद्देसाेमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार सर्व दुकाने

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : प्रत्येक जिल्ह्यातील काेराेनाची स्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये विभागणी केली. त्यामध्ये गडचिराेली जिल्हा तिसऱ्या स्तरावर आहे. राज्य शासनाने याबाबतची नियमावली रविवारी जाहीर केली. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी अनलाॅकसंदर्भात नवीन आदेश जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे गडचिराेली जिल्हा तिसऱ्या स्तरावर असल्याने काय सुरू राहणार व काय बंद राहणार याबाबतचे वृत्त ‘लाेकमत’ने रविवारीच प्रकाशित केले.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेत मोडणारी दुकाने सोमवार ते रविवार सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल. अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. रेस्टॉरंट, उपाहारगृहे सोमवार ते शुक्रवारी सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत ५० डायनिंग क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल. तथापि इतर वेळेस पार्सल / होम डिलिव्हरी सुरू ठेवता येईल. सार्वजनिक स्थळे, खुले मैदान, इ. सार्वजनिक स्थळे, खुले प्रेक्षागृह, मॉर्निंग वॉक, सायकलिंग हे सर्व दिवस सकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत सुरू असेल. खासगी कार्यालये सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल. खासगी / शासकीय कार्यालयातील उपस्थिती ५० ठेवता येईल. याहून अधिक उपस्थिती गरजेची असेल तर संबंधित विभागप्रमुखाने जिल्हाधिकारी गडचिरोली यांची पूर्वपरवानगी घ्यावी. सोमवार ते शुक्रवार सकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत तर सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत आऊटडोअर क्रीडाविषयक बाबी सुरू ठेवण्याची मुभा असेल. 
सामाजिक / सांस्कृतिक / मनोरंजन कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार  सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत कोविड-१९ निर्देशांच्या अधीन राहून सामाजिक अंतर राखून ५० लोकांच्या मर्यादेत सुरू ठेवण्याची मुभा असेल.
स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्था यांच्या बैठका व निवडणुकांबाबत- कोविड-१९ निर्देशांचे अधीन राहून सामाजिक अंतर राखून ५० लोकांच्या मर्यादेत सुरू ठेवण्याची मुभा असेल. सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत प्रत्यक्ष बांधकामस्थळावर कामास मुभा असेल; परंतु कामगारांना दुपारी चार वाजल्यानंतर काम करण्याची परवानगी नसेल. ई-कॉमर्स ‘साहित्य व सेवा’- नियमितपणे सुरू असतील.
सायंकाळी पाच ते सकाळी सात वाजेपर्यंत पाचहून अधिक लोकांना एकत्र जमण्यास मज्जाव असेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था १०० टक्के क्षमतेसह सुरू ठेवता येणार; तथापि सदर वाहनांमध्ये आसनव्यवस्थेव्यतिरिक्त उभ्याने प्रवासी नेण्यास मनाई असेल.
 

सलून व ब्यूटी पार्लर सुरू
-व्यायामशाळा, सलून, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्स इ. सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत कोविड-१९ निर्देशांच्या अधीन राहून ५० टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सुरू ठेवण्याची मुभा असेल तथापि सदर ठिकाणांमध्ये एसीचा वापर करता येणार नाही.

कृषीविषयक सेवा, दुकाने- सोमवार ते रविवार सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील.

विवाहासाठी ५० लाेकांची उपस्थिती

- कोविड-१९ निर्देशाचे अधीन राहून सामाजिक अंतर राखून एकूण ५० लोकांच्या मर्यादेत विवाह पार पाडण्याची मुभा असेल. तथापि याचे उल्लंघन केल्यास रु. ५० हजार रुपयांचा दंड व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. यापूर्वी विवाहासाठी केवळ २५ नागरिकांच्या उपस्थितीची परवानगी हाेती.
- कोविड-१९ निर्देशाचे अधीन राहून एकूण २० लोकांच्या मर्यादेत अंत्यविधीचा कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल.

जिल्हा बंदीचे नियम शिथिल
केवळ पाचव्या स्तरात असलेल्या जिल्ह्यात जाण्यासाठीच इ-पास आवश्यक राहणार आहे. राज्यातील एकही जिल्हा पाचव्या स्तरात नाही. त्यामुळे राज्यभरात इ-पासशिवाय प्रवेश करता येणार आहे. नागरिकांना आता चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गाेंदिया या जिल्ह्यांमध्ये इ-पास शिवाय जाता येणार आहे. 
दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी व तेथून येण्यासाठी यापूर्वीच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

 

Web Title: Collector announces unlock order; The market will open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.