जिल्हाधिकारी सिंगला यांनी केली शेतात जाऊन भात रोवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:25 AM2021-07-11T04:25:19+5:302021-07-11T04:25:19+5:30
साखरा या गावात कृषी विभागाच्या वतीने युवराज उंदीरवाडे यांच्या शेतात रोवणी कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी सिंगला यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. ...
साखरा या गावात कृषी विभागाच्या वतीने युवराज उंदीरवाडे यांच्या शेतात रोवणी कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी सिंगला यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन त्यांना प्रोत्साहन दिले. शेतीमधील उत्पन्न वाढीसाठी आता यांत्रिकीकरण स्वीकारले पाहिजे, असे आवाहन शेतकऱ्यांना केले. परंपरागत शेतीमध्ये खूप मेहनत घ्यावी लागते. उत्पन्नही काहीअंशी कमी राहते. यातून बाहेर पडून शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी, जेणेकरून उत्पन्न वाढेल आणि मेहनतही कमी करावी लागेल, असे सांगितले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, नाबार्डचे जिल्हाप्रमुख राजेंद्र चौधरी, कृषी अधिकारी अरुण वसवाडे, बालाजी कदम, पी. पी. वाहने आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते.
(बॉक्स)
शेतकऱ्यांसाठी येणार पेरणी यंत्र
कृषी विभागाकडून मानव विकास मिशनमधून ट्रॅक्टर वाटप व आवश्यक इतर सयंत्र वाटप केले जात आहे. यातून शेतीमधील उत्पन्न वाढीबरोबरच इतर ताणही कमी होणार असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. येत्या काळात जिल्ह्यातील रबी हंगामातील पेरणी क्षेत्र वाढविण्यासाठीही उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यांत्रिकीकरण योजनेत जिल्ह्यात ४० पेरणी यंत्र घेण्यात येत आहेत. त्यातून किमान प्रती मशीन १०० एकर क्षेत्र पेरून यांत्रिकीकरणाला चालना दिली जाणार आहे.