शिष्यवृत्ती अर्जांबाबत महाविद्यालये उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:34 AM2018-03-15T00:34:28+5:302018-03-15T00:35:15+5:30
सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क योजनेअंतर्गत समाजकल्याण विभागातर्फे आॅफलाईन अर्ज सादर करण्याचे निर्देश होते.
दिलीप दहेलकर ।
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क योजनेअंतर्गत समाजकल्याण विभागातर्फे आॅफलाईन अर्ज सादर करण्याचे निर्देश होते. मात्र गडचिरोली येथील सहायक आयुक्त समाजकल्याण विभागाच्या कार्यालयाला चालू आर्थिक वर्षाचे नवीन व नूतनीकरणाचे जिल्ह्यातील एकाही महाविद्यालयाचे आॅफलाईन अर्ज अद्यापही प्राप्त झाले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्काच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काबाबतच्या अर्जाविषयी महाविद्यालयस्तरावर करावयाच्या कार्यवाही संदर्भात गडचिरोली, देसाईगंज व अहेरी या तीन ठिकाणी शिष्यवृत्तीचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांची कार्यशाळा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली होती. या कार्यशाळेत सन २०१७-१८ मधील द्वितीय, तृतीय व चवथ्या वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या नूतनीकरणाचे अर्ज व नवीन आॅफलाईन अर्ज भरण्याबाबत महाविद्यालयांना मार्गदर्शन करण्यात आले होते. त्यानंतर समाजकल्याण विभागाच्या वतीने वारंवार तोंडी सूचना देण्यात आली होती. मात्र जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयांनी या कार्यवाहीकडे दुर्लक्ष केले. परिणामी समाजकल्याण कार्यालयात आतापर्यंत सन २०१७-१८ चे नवीन व नूतनीकरणाचे आॅफलाईन अर्ज एकाही महाविद्यालयाकडून प्राप्त झाले नाही. केवळ नूतनीकरणाचे अर्ज या कार्यालयाला महाविद्यालयस्तरावरून प्राप्त झाले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्कासाठी १०० टक्के निधी मंजूर करण्याचे आदेश शासनाने निर्गमित केलेले आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या नवीन व नूतनीकरणाचे आॅफलाईन अर्ज समाजकल्याण विभागाकडे सादर करण्यासाठी महाविद्यालयस्तरावरून दिरंगाई होत असल्याने अनेक विद्यार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाविद्यालयाकडून होणाऱ्या दिरंगाईचा मागास विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
२२२ महाविद्यालये संलग्नित
भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्काच्या लाभासाठी गडचिरोली जिल्ह्यातील महाविद्यालयांनी समाजकल्याण विभागाकडे नोंदणी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण २२२ महाविद्यालये समाजकल्याण कार्यालयाशी सदर योजनेच्या लाभाकरिता संलग्नित आहे. यामध्ये इयत्ता ११ वी ते पदवी, पदव्युत्तर व इतर अभ्यासक्रम चालविणाºया महाविद्यालयांचा समावेश आहे.
द्वितीय, तृतीय व चवथ्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या नूतनीकरणाचे अर्ज आॅनलाईन प्रणालीद्वारे संबंधित महाविद्यालयांनी तसेच २०१७-१८ मधील नवीन आॅफलाईन अर्ज २० मार्च २०१८ पूर्वी सहायक आयुक्त समाजकल्याण गडचिरोली या कार्यालयात सादर करावे, यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर संबंधित महाविद्यालयाच्या कर्मचाºयांनी संपर्क साधावा.
- विनोद मोहतुरे, सहायक आयुक्त,
समाजकल्याण गडचिरोली