ठिकठिकाणी नक्षल्यांच्या पुतळ्यांचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 10:18 PM2018-07-29T22:18:21+5:302018-07-29T22:18:48+5:30
नक्षलवादाविरोधात संताप व्यक्त करत नागरिकांनी ठिकठिकाणी नक्षल्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहण केले. तसेच ठिकठिकाणी नक्षल विरोधी रॅली काढून नक्षल्यांनी ठार केलेल्या नागरिकांचे स्मारक उभारले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलवादाविरोधात संताप व्यक्त करत नागरिकांनी ठिकठिकाणी नक्षल्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहण केले. तसेच ठिकठिकाणी नक्षल विरोधी रॅली काढून नक्षल्यांनी ठार केलेल्या नागरिकांचे स्मारक उभारले.
नक्षलवाद्यांतर्फे २८ जुलै ते ३ आॅगस्ट या दरम्यान शहीद नक्षल सप्ताहाचे आयोजन केले आहे. पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तामुळे सुरूवातीचे दोन दिवस कोणतीही हिंसक घटना घडली नाही. या उलट नागरिकांनी नक्षल नेत्यांचे पुतळे जाळून नक्षलवादाविरोधात घोषणा दिल्या. अहेरी तालुक्यातील देचलीपेठा येथील नागरिकांनी नक्षल विरोधी रॅली काढली. त्यानंतर नक्षलवाद्याचे प्रतिकात्मक पुतळे जाऊन नक्षलवादी विचारसरणीला उघडपणे विरोध दर्शविला. रॅलीमध्ये विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांनी नक्षल भगाओ, आदिवासी बचाओ, शासनाची साथ, गावाचा विकास आदी घोषणा दिल्या.
अहेरी पोलीस स्टेशनतर्फे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ए. राजा व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनात आलापल्ली येथे नक्षल विरोधी रॅली काढण्यात आली. रॅलीत अहेरीचे पोलीस निरिक्षक सतीश होडगर, सहायक पोलीस निरिक्षक बाळासाहेब शिंदे, हजारे, पीएसआय कनसे, आलापल्लीचे व्यापारी नदीर शेख, अलताफ पठाण, तंमुस अध्यक्ष सुरेश गडमवार, प्राचार्य संजय कोडेलवार, पर्यवेक्षक ताजने यांच्यासह आलापल्ली येथील नागरिक, विद्यार्थी सहभागी झाले होते. भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे सुध्दा नक्षल्यांचा पुतळा जाळण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनात बेडगाव येथे नक्षलविरोधी रॅली काढण्यात आली. सदर रॅलीत बेडगाव पोलीस मदत केंद्राचे पीएसआय चेतन ढेकने, नितेश पोटे यांच्यासह गावकरी व शालेय विद्यार्थी सहभागी झाले. नागरिकांच्या मनातील भिती दूर करून गावातील दुकाने उघडावयास लावली.
नक्षल सप्ताहाच्या दुसºया दिवशीही वाहतूक ठप्प
नक्षल सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीही दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील वाहतूक ठप्प पडली होती. तर नागरिकांनी नक्षल्यांचे पुतळे जाळून नक्षलवादाविरोधात आपला संताप व्यक्त केला. २८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत नक्षल्यांतर्फे शहीद नक्षल सप्ताहाचे आयोजन केले आहे. या कालावधीत नक्षल्यांकडून हिंसक घटना घडू नये यासाठी पोलीस विभागामार्फत तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. मात्र दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील नागरिकांच्या मनामध्ये नक्षल सप्ताहाची भिती असल्याने नक्षल सप्ताहाच्या पहिल्या दिवशी दुर्गम भागातील एसटी फेऱ्या व खासगी वाहतूक बंद होती. दुसऱ्या दिवशी वाहतूक सुरळीत होईल, असा अंदाज होता. मात्र दुसऱ्या दिवशीही वाहतूक बंद होती. धान रोवणीच्या कामांना मात्र सुरूवात झाली. पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे पहिले दोन दिवस कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मुरूमगाव परिसरातील खासगी वाहतूक बंद आहे. मात्र एसटी बसेस धानोरा ते मुरूमगाव पर्यंत सुरू आहेत. दुर्गम भागातील फेºया बंद आहेत. मुरूमगाव येथील दुकाने शनिवारीही सुरू होती.