गाव विकासासाठी एकत्र या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:23 PM2017-12-11T23:23:16+5:302017-12-11T23:24:14+5:30
राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन चांगले काम करावे, चांगल्या कामातून ग्रामस्थांनी गावाचा विकास साधावा, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
तळोधी (मो.) : राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन चांगले काम करावे, चांगल्या कामातून ग्रामस्थांनी गावाचा विकास साधावा, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले.
कुनघाडा (रै.) ग्रामपंचायत आवारात कुनघाडा (रै.), नवेगाव (रै.) व तळोधी (मो.) या तीन गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या भूमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते उद्घाटक बोलत होते. यावेळी मंचावर सहउद्घाटक आ. डॉ. देवराव होळी तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, आ. कृष्णा गजबे, माजी जि.प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, नगराध्यक्ष योगीता पिपरे, सरपंच अविनाश चलाख, पं.स. सभापती आनंद भांडेकर, पं. स. सदस्य सुभाष वासेकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, तळोधीच्या सरपंच माधुरी सुरजागडे, नामदेव उडाण, जि.प. सदस्य रमेश बारसागडे, बाबुराव कुकुडे, संतोष भांडेकर, जलप्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता संजय वाघ, श्रावण भांडेकर, उपसरपंच दुधबळे, मीना कोडाप, दिलीप चलाख आदी मान्यवर उपस्थित होते.
शनिवारी खा. अशोक नेते यांच्या हस्ते प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन ग्रामपंचायतीच्या आवारात करण्यात आले. पुढे बोलताना खा. नेते म्हणाले, सरकारच्या निर्देशानुसार ग्राम आराखडा पाच वर्षांचा बनवून त्यानुसार विकास कामे होऊ शकतात. त्यादृष्टीने सरकारचे प्रयत्न असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाच बंधारे पूर्णत्वास आले असून यापुढेही सिंचन सुविधेवर भर राहणार आहे. वन विभागाच्या अटी दूर होताच रेल्वे व राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होणार आहे, असे नेते यांनी सांगितले. सदर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत वॉटर फिल्टर सुविधेमुळे तीन गावातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाबाबत विद्यमान केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता संजय वाघ, संचालन जि.प. सदस्य रमेश बारसागडे यांनी केले तर आभार अभियंता अभय कोतपल्लीवार यांनी मानले. कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व नागरिक उपस्थित होते.