येत्या सत्रात मुलांना शाळेत पाठविणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 11:00 PM2018-06-04T23:00:30+5:302018-06-04T23:01:03+5:30
तालुक्यातील डोंगरसावंगी गावात इयत्ता पहिली ते चवथीपर्यंत जि.प. ची प्राथमिक शाळा आहे. या शाळेच्या दोन इमारती जीर्ण झाल्या. तिसऱ्या इमारतीला तळे गेल्यामुळे ते वर्ग भरविण्याच्या उपयोगाची नाही. त्यामुळे येत्या सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात मुलांना कुठे बसवून शिकवायचे, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
महेंद्र रामटेके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील डोंगरसावंगी गावात इयत्ता पहिली ते चवथीपर्यंत जि.प. ची प्राथमिक शाळा आहे. या शाळेच्या दोन इमारती जीर्ण झाल्या. तिसऱ्या इमारतीला तळे गेल्यामुळे ते वर्ग भरविण्याच्या उपयोगाची नाही. त्यामुळे येत्या सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात मुलांना कुठे बसवून शिकवायचे, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तात्पुरता उपाय म्हणून मागील शैक्षणिक सत्रात ही शाळा चक्क ग्रामपंचायतीच्या इमारतीत भरविण्यात आली. शाळा इमारत बांधकामासाठी पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे येत्या शैक्षणिक सत्रात शाळेच्या पहिल्या दिवसापासून मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्धार समितीचे पदाधिकारी, पालक व ग्रामस्थांनी केला आहे.
नवीन शाळा इमारत बांधकामासाठी व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी ठराव घेऊन प्रशासनाकडे पाठविला. अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. ‘आम्हाला बसण्यासाठी छत द्या’ अशी मागणी करणाºया चिमुकल्या विद्यार्थ्यांसह गावकºयांचे हाक मात्र प्रशासनाला ऐकू आली नाही. त्यामुळे ग्रामस्थ प्रशासनाप्रती नाराज झाले आहेत.
आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येणाºया डोंगरसावंगी गावात इयत्ता पहिली ते चवथीपर्यंतची शाळा आहे. शाळेत चार शिक्षक असून विद्यार्थी पटसंख्या १०२ आहे. येथील शाळेच्या दोन जुन्या कौलारू इमारती मोडकळीस येऊन जीर्ण झाल्या. जुन्या इमारतीच्या निर्लेखनाचा ठराव घेऊन नवीन शाळा इमारत बांधकामाची मागणी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी केली आहे. मात्र अद्यापही जुन्या शाळा इमारतीचे प्रशासनाने निर्लेखन केले नाही. प्रत्यक्षात दोन वर्गखोल्याची एक इमारत आहे. मात्र या इमारतीलाही भेगा गेल्याने पावसाळ्यात पाणी गळती लागते. जि.प. बांधकाम उपविभाग वडसाच्या वतीने सदर शाळा इमारतीची पाहणी करण्यात आली. इमारतीचे स्ट्रक्चर अॅडिट सर्वेक्षण करून सदर शाळेच्या जीर्ण व धोकादायक इमारतीत शाळा भरवू नये, असे पत्र मुख्याध्यापकांना दिले. त्यामुळे मागील सत्रात चार ते पाच महिने ही शाळा ग्रामपंचायतीच्या इमारतीत भरविण्यात आली.
२०१२ पासून डोंगरसावंगीवासीयांची शाळा इमारत बांधून देण्याची मागणी सातत्याने सुरू आहे. मात्र गटशिक्षणाधिकाºयांसह प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत मागील काही वर्षात तालुक्यासह जिल्ह्यात शाळा वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात आले. आवश्यकता नसलेल्या ठिकाणी वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात आले. मात्र डोंगरसावंगी येथे नव्या वर्गखोल्यांची गरज असताना प्रशासकीय अधिकारी इमारत बांधकामाबाबत उदासीन आहेत.
शिक्षण विभागाचे अधिकारी याबाबत सुस्त असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
लेखी पत्रातून प्रशासनाला दिला इशारा
येत्या शैक्षणिक सत्रात २६ जूनला शाळा सुरू होणार आहे. डोंगरसावंगी येथे नवीन शाळा इमारत बांधकाम मंजूर झाल्याशिवाय पहिल्या दिवसांपासून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही, असा ठराव १३ एप्रिल २०१८ रोजी घेऊन तसा इशारा शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. या ठरावावर अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सदस्य, सचिवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
डोंगरसावंगी येथील जि.प. शाळेला इमारत बांधकाम करून देण्याबाबत स्थानिक व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने ठराव घेऊन प्रशासन व शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आले. या मागणीला घेऊन दरवर्षी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र दखल घेण्यात आली नाही. नवी शाळा इमारत मंजूर होऊन बांधकाम सुरू होईपर्यंत शाळा न भरविण्याचा ठराव शाळा व्यवस्थापन समिती,पालकांनी घेतला आहे. त्यामुळे इमारत बांधकामाची कार्यवाही व्हावी.
- टिकाराम नारनवरे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, डोंगरसावंगी