आशीर्वादनगर व गोकुळनगरात विकासकामांचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:35 AM2021-03-20T04:35:53+5:302021-03-20T04:35:53+5:30
राेड कामाचा शुभारंभ करताना नगराध्यक्ष योगिता पिपरे व अन्य. गडचिरोली : स्थानिक नगर परिषदेंतर्गत येणाऱ्या गोकुळनगर प्रभाग क्र. १२ ...
राेड कामाचा शुभारंभ करताना नगराध्यक्ष योगिता पिपरे व अन्य.
गडचिरोली : स्थानिक नगर परिषदेंतर्गत येणाऱ्या गोकुळनगर प्रभाग क्र. १२ मधील माता मंदिर चौक येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत, तसेच प्रभाग क्र. ७ मधील आशीर्वादनगर येथे नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत राेड व नाल्यांच्या कामांचा शुभारंभ नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्या हस्ते करण्यात आला.
गाेकुळनगरात नीलकंठ भांडेकर ते बोबाटे यांच्या प्लॉटपर्यंत रस्ता खडीकरण बांधकामाचे भूमिपूजन १७ मार्च रोजी करण्यात आले. सदर रस्त्याच्या कामाची अंदाजित रक्कम १२ लाख ४३ हजार ५०० रुपये एवढी असून, २५० मीटर लांबीचे बांधकाम आहे. गोकुळनगर प्रभाग क्र. १२ मध्ये मागील ४ वर्षांत दलित वस्तीमधून ५ कोटींची विकासकामे सुरू आहेत. यामध्ये सिमेंट रस्ते, सिमेंट काँक्रीट नाली बांधकाम, राेड डांबरीकरण, अशी अनेक कामे सुरू आहेत. आशीर्वादनगर येथे नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मोहितकर यांच्या घरापासून ते देशमुख यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट नाली बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला बांधकाम सभापती प्रवीण वाघरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, नगरसेवक ॲड. नितीन उंदीरवाडे, नगरसेविका नीता उंदीरवाडे, कंत्राटदार मोहन वरगंटीवार, प्रवीण कांबळे, सतीश भांडेकर, मनोज मोप्पिडवार, शुभन वरगंटीवार कंत्राटदार चंद्रशेखर भुरसे, देवीदास खोब्रागडे यांच्यासह वाॅर्डातील नागरिक उपस्थित होते. आशीर्वादनगर येथे नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मोहितकर यांच्या घरापासून ते देशमुख यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट नाली बांधकामाची अंदाजित रक्कम ५ लाख ३७ हजार ५३८ रुपये एवढी असून, १८० मीटर लांबीचे बांधकाम आहे.