आरमोरी, अहेरीसह जिल्ह्यात नवरात्र उत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 05:00 AM2020-10-18T05:00:00+5:302020-10-18T05:00:25+5:30
आरमोरी येथील दुर्गा उत्सवाला गेल्या कित्येक वर्षांची परंपरा आहे. मोठ्या भक्ती भावाने हा उत्सव साजरा केला जातो. आरमोरी येथील नव दुर्गा उत्सव मंडळ मोटार स्टँड आरमोरी व दुर्गा माता देवस्थानच्या वतीने दरवर्षी देशातील नामांकित मंदिराच्या महाकाय प्रतिकृती हुबेहूब साकारण्यात येत होत्या. तसेच शारदा उत्सव मंडळाच्या वतीने विविध देखावे साकारण्यात येत होते. या प्रतिकृती पाहण्यासाठी व मातेच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा रात्रभर पाहायला मिळत होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी/अहेरी : गडचिरोली जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात आरमोरी येथील दुर्गा उत्सव प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो भाविक या उत्सवात सहभागी होत होते. मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणाऱ्या दुर्गा उत्सवावर कोरोनामुळे विरजण पडले आहे. अहेरी शहरासह उपविभागातील दुर्गा उत्सव दक्षिण भागात प्रसिद्ध आहे. मात्र कोरोना संकटामुळे यंदा गरबा व दांडिया नृत्याला ब्रेक लागला आहे.
आरमोरी येथील दुर्गा उत्सवाला गेल्या कित्येक वर्षांची परंपरा आहे. मोठ्या भक्ती भावाने हा उत्सव साजरा केला जातो. आरमोरी येथील नव दुर्गा उत्सव मंडळ मोटार स्टँड आरमोरी व दुर्गा माता देवस्थानच्या वतीने दरवर्षी देशातील नामांकित मंदिराच्या महाकाय प्रतिकृती हुबेहूब साकारण्यात येत होत्या. तसेच शारदा उत्सव मंडळाच्या वतीने विविध देखावे साकारण्यात येत होते. या प्रतिकृती पाहण्यासाठी व मातेच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा रात्रभर पाहायला मिळत होत्या. आरमोरी शहरात सायंकाळपासून हजारो भाविक भक्ताचे लोंढे मिळेल ती वाहने घेऊन येत होते त्यामुळे विद्युत रोषणाई व गर्दीने संपूर्ण शहर फुलून जायचे. उत्सवात संपूर्ण जाती धर्माचे लोक सहभागी होत होते त्यामुळे सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणून या उत्सवाकडे पाहिले जाते.
दरवर्षी विविध जिल्ह्यातील लोक हा उत्सव पाहण्यासाठी आपल्या नातेवाईकाकडे येत होते. त्यामुळे सर्वांच्या भेटीगाठी या उत्सवाच्या माध्यमातून होत होत्या. उत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी मनोरंजन पार्क (मीना बाजार) उभारण्यात येत होते. एकंदरीत या उत्सवाची व्याप्ती सातासमुद्रापार पसरली असून उत्सव हायटेक झाला होता.
मात्र यावर्षी एन कोरोनाच्या संकटात नव दुर्गा उत्सव आल्याने या उत्सवा वर विरजण पडले आहे. सामाजिक व धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून लोकांची गर्दी होऊ शकते म्हणून गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व नियमाच्या अधीन राहून हा उत्सव अतिशय साधेपणाने साजरा केला जात आहे. त्यामुळे उत्साह हरविला तरी दरवर्षी चालत आलेली परंपरा कायम ठेवण्यासाठी अत्यंत साधेपणाने शांततेत दुर्गा उत्सव मंडळाचे वतीने साजरा केला जात आहे.
यंदा दुर्गा उत्सवात गरबा दांडियाचा नृत्य पहायला मिळणार नाही. त्यामुळे यावर्षी दरवर्षी होणाऱ्या सर्व उपक्रमाला मंडळानी फाटा दिला आहे कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व जण तयार असून या वर्षीच्या दुर्गा उत्सवात कोरोना बदल जनजागृती करण्यावर मंडळाचा भर राहणार आहे.
अहेरीत दुर्गा उत्सवाची परंपरा कायम
अहेरी शहर व उपविभागात दुर्गोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. श्री आदर्श दुर्गा उत्सव मंडळ अहेरी वॉर्ड क्र.३ मधील राजे विश्वेश्वरराव महाराज स्टेडियम हॉकी ग्राऊंड येथे दुर्गा मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. भारतातील विविध स्थळांच्या धार्मिक मंदिराच्या प्रतिकृती साकारण्यात येतात. त्यामुळे अहेरीचा नवरात्रोत्सव भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र असते. मात्र यंदा कोरोना संकटामुळे शासनाच्या आदेशानुसान अत्यंत साध्यापणाने दुर्गा उत्सव साजरा केला जात आहे. अहेरी येथील दुर्गा उत्सव जिल्ह्यासह विदर्भात प्रसिद्ध असून लगतच्या आंधप्रदेशन, तेलंगणा, छत्तीसगड राज्यातून भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात. मात्र यंदा कोरोना संकटामुळे भाविकांच्या आनंदावर विरजन पडले असून हा उत्सव अतिशय साध्यापणाने साजरा केला जात असल्याची माहिती दुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी अशोक आईंचवार यांनी दिली आहे.