आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध
By admin | Published: August 10, 2015 12:52 AM2015-08-10T00:52:26+5:302015-08-10T00:52:26+5:30
महाराष्ट्र राज्यात जवळपास ९५ लाख आदिवासी आहेत. आदिवासी बांधव अद्यापही दऱ्याखोऱ्यात जंगलात वास्तव्य करीत आहेत.
जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम : अशोक नेते यांचे प्रतिपादन
गडचिरोली : महाराष्ट्र राज्यात जवळपास ९५ लाख आदिवासी आहेत. आदिवासी बांधव अद्यापही दऱ्याखोऱ्यात जंगलात वास्तव्य करीत आहेत. परिणामी ते विकासापासून कोसोदूर आहेत. आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आपले ध्येय आहे. त्यासाठी आपण प्राधान्याने शासनस्तरावर पाठपुरावा करणार, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.
आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन जिल्हा शाखा गडचिरोली व विविध आदिवासी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी येथील गोंडवाना कलादालनात जागतिक आदिवासी दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष भरत येरमे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू राजगडकर, ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रकाश गेडाम, ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, जि.प. सदस्य केसरी उसेंडी, पद्माकर मानकर, डॉ. हेमंत मसराम, हलबा हलबी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शालिक मानकर, चामोर्शीचे संवर्ग विकास आधिकारी बादलशहा मडावी, जिल्हा सेवा योजन अधिकारी भैय्याजी येरमे, डॉ. प्रविण किलनाके आदी मान्यवर उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींच्या समस्या सोडविण्याला आपण प्राधान्य देऊ तसेच गडचिरोली येथील आदिवासी समाज बांधवांच्या गोटूल भवनासाठी खासदार निधीतून २० लाख रूपये देण्याचे खासदार अशोक नेते यांनी यावेळी मान्य केले.
याप्रसंगी माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी म्हणाले, आदिवासी बांधवांनीच खऱ्या अर्थाने वसुंधरेच्या संवर्धनाचे प्रामाणिक काम केले आहे. आदिवासींची भाषा, संस्कृती टिकली पाहिजे. सध्या आदिवासींच्या आरक्षणातून धनगरासारख्या जमातींना आरक्षण देण्याचे षडयंत्र रचले जात आहे. यामुळे आदिवासींच्या आरक्षणावर अतिक्रमण होईल. आदिवासींनी आपले आरक्षण व संरक्षण टिकवून ठेवण्यासाठी संघटितपणे आंदोलनाची तयारी ठेवावी, असे उसेंडी यावेळी म्हणाले.
यांप्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सदानंद ताराम यांनी केले तर संचालन वनिशाम येरमे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)