देशात समतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण व्हावी
By admin | Published: March 20, 2016 01:11 AM2016-03-20T01:11:49+5:302016-03-20T01:11:49+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानातून समानतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्याचे ध्येय बाळगले होते.
विद्यापीठात परिसंवाद : ई. झेड. खोब्रागडे यांचे प्रतिपादन
गडचिरोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानातून समानतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्याचे ध्येय बाळगले होते. मात्र अद्यापही भारतात समानतेवर आधारित १०० टक्के समाजव्यवस्था निर्माण झाल्याचे दिसत नाही. भारतातील सर्व नागरिकांच्या विकासासाठी तसेच परिवर्तनासाठी समानतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने शनिवारी स्थानिक गोंडवाना विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित परिसंवादात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर होते. प्रमुख अतिथी म्हणून आंबेडकरी विचारवंत अॅड. संदेश भालेकर, प्रा.डॉ. नंदाजी सातपुते, प्रा. दिलीप बारसागडे, पत्रकार रोहिदास राऊत आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ई. झेड. खोब्रागडे म्हणाले, भष्ट्राचार, अन्याय, अत्याचार या विषमतेच्या गोष्टी आहेत. डॉ. आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या सामाजिक न्याय विभागावर बहुजनांच्या कल्याणाची व विकासाची मोठी जबाबदारी आहे. डॉ. आंबेडकर यांनी भारताला दिलेल्या संविधानाच्या बाहेर कोणीच नाही. शोषित, आदिवासी, दलित, पीडित व सर्वसामान्य माणसाला देशात सन्मानाने जगता आले पाहिजे, यासाठी भारतीय संविधानाने समान अधिकार व हक्क दिले आहेत. भारतीय संविधानाच्या काटेकोर अंमलबजावणीतून समानतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहनही खोब्रागडे यांनी यावेळी केले. कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची मानसिकता बदलल्याशिवाय देशात १०० टक्के सामाजिक न्याय व समानता प्रस्थापित होणार नाही, असे सांगितले. याप्रसंगी प्रा. दिलीप बारसागडे, रोहिदास राऊत यांनीही मार्गदर्शन केले. संचालन विद्यार्थी कल्याणचे संचालक डॉ. ईश्वर मोहुर्ले तर आभार डॉ. दीपक जुनघरे यांनी मानले.(स्थानिक प्रतिनिधी)
भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ- भालेकर
डॉ. आंबेडकर यांनी भारताला दिलेले संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ आहे. या संविधानातून सर्वच नागरिकांना मतदानाचा अधिकार बहाल केला आहे. गणतंत्र राज्याचे मार्गदर्शक तत्त्वही या संविधानात अंतर्भूत असल्याने भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन अॅड. संदेश भालेकर यांनी यावेळी केले. याप्रसंगी त्यांनी विविध विचारवंताचे दाखले देऊन भारतीय संविधानाची महती विशद केली.