जिल्ह्यातील अनुकंपाधारक आक्रमक
By admin | Published: December 28, 2016 03:08 AM2016-12-28T03:08:45+5:302016-12-28T03:08:45+5:30
शासकीय कार्यालय ते मंत्रालयापर्यंत सातत्याने येरझारा मारल्यानंतरही शासनाचे गडचिरोली जिल्ह्यातील अनुकंपाधारकांना शासकीय सेवेत
विजय खरवडे यांची माहिती : शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना मुंबईत भेटणार
गडचिरोली : शासकीय कार्यालय ते मंत्रालयापर्यंत सातत्याने येरझारा मारल्यानंतरही शासनाचे गडचिरोली जिल्ह्यातील अनुकंपाधारकांना शासकीय सेवेत सामावून घेण्याकडे दुर्लक्ष होत आहे. आता जिल्ह्यातील सर्व अनुकंपाधारक एकवटले असून येत्या आठ दिवसात मुंबईच्या मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते विजय खरवडे यांनी मंगळवारी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी त्यांनी सांगितले की, वन विभागाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ११७ आदिवासी विकास विभागाअंतर्गत ३० तसेच इतर विभागाअंतर्गतही अनेक अनुकंपाधारक गेल्या सात-आठ वर्षांपासून शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्याकडे निवेदन देण्यात आले. मात्र लोकप्रतिनिधीही यासंदर्भात उदासीन आहेत, असा आरोप उपस्थित अनुकंपाधारकांनी केला.
मंगळवारी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व विभागातील अनुकंपाधारकांमधून वर्ग ३ व ४ ची पदे भरण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे, अशी माहिती खरवडे यांनी दिली. पत्रकार परिषदेला मनोज सयाम, चंद्रशेखर उसेंडी, जयदेव नैताम, सुषमा किरंगे, प्रभाकर पदा, अमोल किरंगे, शुभांगी कोहळे, मनोज नरूले, आशिष कुमरे, लतीफ भोयर, श्वेता जिवने, शारदा पेंदाम आदी अनुकंपाधारक उपस्थित होते.