विजेसंबंधीची तक्रार करा आता मुंबईत

By admin | Published: June 13, 2014 12:06 AM2014-06-13T00:06:27+5:302014-06-13T00:06:27+5:30

महावितरणच्या ग्राहकांच्या तक्रारींचा विशेषत: वीज पुरवठा खंडीत होण्याच्या तक्रारीची दखल पूर्वी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावरही तक्रार निवारण केंद्रात घेण्यात येत होती. फेब्रुवारी महिन्यापासून

Complain about electricity now in Mumbai | विजेसंबंधीची तक्रार करा आता मुंबईत

विजेसंबंधीची तक्रार करा आता मुंबईत

Next

गडचिरोली : महावितरणच्या ग्राहकांच्या तक्रारींचा विशेषत: वीज पुरवठा खंडीत होण्याच्या तक्रारीची दखल पूर्वी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावरही तक्रार निवारण केंद्रात घेण्यात येत होती. फेब्रुवारी महिन्यापासून हे केंद्र बंद करण्यात आले आहे. आता वीजेसंबधीची तक्रार मुंबई भांडूप येथील केंद्रीय ग्राहक तक्रार निवारण केंद्रातच स्विकारली जाणार आहे. गेल्या पाच महिन्यापासून महावितरणाने ही व्यवस्था निर्माण केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती महावितरणाच्या नागपूर परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
महावितरणाने सुरू केलेल्या या केंद्रीय तक्रार निवारण केंद्राचा टोल फ्री क्रमांक १८००२३३३४३५ व १८००२००३४३५ असा आहे. २४ तास ग्राहकांना या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदविता येणार आहे. महावितरणाचे साधारणत: १ कोटी ५८ लाख घरगुती ग्राहक राज्यामध्ये आहे. वीज पुरवठा खंडीत होणे, वीज बिल जास्त येणे, अशा तक्रारी असतात. त्यासाठी त्यांना महावितरणाच्या नजिकच्या कार्यालयात जाण्याऐवजी घरबसल्या या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. या क्रमांकावर तक्रार नोंदविल्यानंतर ग्राहकांना तक्रार क्रमांक उपलब्ध होतो. तक्रार क्रमांक नोंदविल्याने व तो उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या तक्रारीचा पाठपुरावा करणे सहज शक्य होत आहे. या क्रमांकावर कुठेही स्पार्कींग होत असल्यास तसेच शॉर्टसर्कीट झाले असल्यास व तत्सम तक्रारी नोंदविणेही शक्य आहे. नवीन वीज कनेक्शन हवे असल्यास योग्य माहिती पुरविली जाते.
तक्रारकर्त्या ग्राहकांना त्यांचा ग्राहक क्रमांक माहित असणे आवश्यक आहे. ग्राहक क्रमांक वीजबिलावर उपलब्ध असतो. ग्राहकांनी त्यांचे तीन मोबाईल क्रमांक किंवा लॅन्डलाईन क्रमांक व ग्राहक क्रमांक एकदाच नोंदवायचा असतो. त्यामुळे ग्राहकांना तक्रार निवारण केंद्रामधून वारंवार ग्राहक क्रमांकाची विचारणा होत नाही. हे सर्व करण्यासाठी एक पैशाचाही खर्च कॉलसाठी येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Complain about electricity now in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.