मद्यधुंद अवस्थेत खेळाडू विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन, 'गोंडवाना'च्या प्रशिक्षक व व्यवस्थापकाविरोधात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 10:54 AM2023-01-31T10:54:30+5:302023-01-31T12:02:23+5:30
परत येताच खेळाडूंनी केली प्र-कुलगुरुंकडे तक्रार
गडचिराेली : आंतर विद्यापीठ बाॅल बॅडमिंटन स्पर्धेसाठी गेलेल्या गाेंडवाना विद्यापीठातील महिला बॅडमिंटनपटूंशी चेन्नई येथे प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांनी गैरवर्तन केले. त्यामुळे प्रशिक्षक व व्यवस्थापकांवर कारवाई करावी, अशी मागणी खेळाडूंनी गडचिराेलीत परत येताच केली. या मुद्द्याने आता वातावरण तापले आहे.
आंतर विद्यापीठ बॉल बॅडमिंटन स्पर्धा २७ ते ३० जानेवारीदरम्यान चेन्नई येथे झाली. या स्पर्धेकरिता गाेंडवाना विद्यापीठाच्या महिला खेळाडूंचा संघ २५ जानेवारीला चंद्रपूर रेल्वेस्थानकावरून चेन्नईच्या दिशेने रवाना झाला. विद्यापीठाने मुलींच्या संघाकरिता प्रशिक्षक व संघसंचालक म्हणून महिला प्रशिक्षक व संचालकांना पाठविणे गरजेचे हाेते. मात्र, विद्यापीठाने तसे न करता संघसंचालक विजय सोनकुवर व प्रशिक्षक राकेश हजारे यांना पाठविले.
चेन्नई येथे पाेहाेचल्यानंतर संचालक सोनकुवर व प्रशिक्षक हजारे हे पहिल्या दिवशीपासूनच मद्यधुंद अवस्थेत राहून खेळाडूंना त्रास देण्याचे काम करीत हाेते. याशिवाय मुंबई व अमरावती विद्यापीठातील महिला खेळाडूंच्या रूममध्ये जाऊन मोबाइल चार्जिंग करायचा आहे, तुम्ही गोंदियाचे खेळाडू आहेत का, अशी विचारणा करून त्यांना दारूच्या नशेत त्रास दिला.
३० जानेवारीला गडचिरोली येथे परत आल्यानंतर विद्यार्थिनींनी हा प्रकार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर यांना सांगितला. झालेल्या प्रकाराची विद्यार्थिनी माहिती सांगत असताना संघसंचालक विजय सोनकुवर हे तेथे पाेहाेचले. तुम्ही जर माझी तक्रार केली तर पुढील वर्षात होणाऱ्या आंतरविद्यापीठ बॉल बॅडमिंटन खेळाडू संघात तुम्हाला सहभागी होऊ देणार नाही, तसेच झालेल्या प्रकरणाची तक्रार माझ्या समक्ष विद्यापीठ क्रीडा संचालकांना करा, अशी विनंती करीत होते.
खेळाडू विद्यार्थिनींनी व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्र. कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे व विद्यापीठ क्रीडा संचालक प्राध्यापक अनिता लोखंडे यांची भेट घेऊन सोनकुवर व हजारे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
रेल्वेमध्ये झाली गैरसाेय
संघसंचालकांनी खेळाडू विद्यार्थिनींना प्रवासभत्ता व विशेष भत्ता दिला नाही. प्रवास करताना रेल्वेमध्ये खेळाडू विद्यार्थिनींची गैरसोय झाली. गैरसोयीसंदर्भात संघसंचालकांना सांगितले असता, तुम्ही तुमचे बघून घ्या किंवा स्वच्छतागृहात जाऊन बसा, मला काही देणेघेणे नाही, असे उद्धट उत्तर दिले.