सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 10:09 PM2019-07-01T22:09:47+5:302019-07-01T22:10:00+5:30
मुलचेराचे संवर्ग विकास अधिकारी यांनी केलेल्या तक्रारीवरून तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायातीच्या सरपंच ममता बिश्वास व ग्रामसेवक सुनील जेट्टीवार यांच्या विरोधात मुलचेरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुलचेरा : मुलचेराचे संवर्ग विकास अधिकारी यांनी केलेल्या तक्रारीवरून तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायातीच्या सरपंच ममता बिश्वास व ग्रामसेवक सुनील जेट्टीवार यांच्या विरोधात मुलचेरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
डिजिटल साहित्य खरेदीत गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे सरपंच व ग्रामसेवकांविरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी गौरव बाला व ग्रामपंचायत सदस्यांनी २४ जूनपासून विवेकानंदपूर ग्रामपंचायत समोर उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेऊन २७ जुलै रोजी संवर्ग विकास अधिकारी मुकेश मोहर, विस्तार अधिकारी साईनाथ साळवे, लेखाधिकारी यांनी चौकशी केली असता, २०१६ ते २०१९ पर्यंत चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतील सुमारे ५० लाख ८८ हजार ७०३ रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्यसाचे आढळून आले. संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी मुलचेरा पोलीस स्टेशनमध्ये सरपंच ममता बिश्वास व ग्रामसेवक सुनील जेट्टीवार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधात कलम ४०६, ४०९, ४२०, ३४, १७५, १८७ अन्वये गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिपर्यंत दोघांनाही अटक करण्यात आली नव्हती.
संवर्ग विकास अधिकारी मुकेश मोहर यांनी उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी पाजले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.