जुलै अखेर पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 11:51 PM2019-07-06T23:51:11+5:302019-07-06T23:52:07+5:30
शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत उपलब्ध झाल्यास मशागतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व बँकांनी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जुलै अखेर गाठावे, अशा सूचना गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व बँकांना दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत उपलब्ध झाल्यास मशागतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व बँकांनी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जुलै अखेर गाठावे, अशा सूचना गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व बँकांना दिले आहेत.
शेतकºयांसाठी मिळणाºया पीक कर्ज प्रक्रियेत अडचणी निर्माण होत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा कक्षाला प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांच्या पीक कर्ज प्रकरणांचा आढावा घेतला. पीक कर्ज प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व बँकांना विविध सूचना केल्या आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळणे आवश्यक आहे. अन्यथा पीक लागवडीचा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी धावपळ करावी लागते. परिणामी पैशाअभावी काही शेतकरी आपली जमीन पडिक ठेवतात. अशी परिस्थिती कोणत्याही शेतकऱ्यावर येऊ नये, याकरिता सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांनी पीक कर्ज वितरणास प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंह यांनी केले.
कोणत्याही शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना काही अडचणी निर्माण होत असल्यास त्यांनी थेट गडचिरोली येथील अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांकडे अडचणी मांडून दाद मागावी, असे आवाहन त्यांनी केले. सदर बँकेचे व्यवस्थापकाने तातडीने कार्यवाही करून संबंधित शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. यावेळी अधिकारी उपस्थित होते.
स्व:घोषणापत्र अनिवार्य
पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेत सर्वात मोठी अडचण ही कागदपत्र पूर्ततेची आहे. कोणत्याही शेतकऱ्यांकडून पीक कर्जासाठी इतर बँकांचे बेबाकी किंवा नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) घ्यावयाचे नाही. तसेच आॅनलाईन सातबारा काढल्यानंतर त्याच्यावर कोणत्याही प्रकारच्या सहीशिक्क्याची गरज नाही, असे जिल्हाधिकारी सिंह यांनी म्हटले आहे. पीक कर्जासाठी सातबाऱ्यावर बोजा चढविण्याची आवश्यकता नाही. मात्र शेतकºयाने स्व:घोषणापत्र सादर करणे अनिवार्य आहे, असे त्यांनी सांगितले.