जिल्ह्यात १८९ रस्त्यांचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2017 01:01 AM2017-04-18T01:01:58+5:302017-04-18T01:01:58+5:30
पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत २४२ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैैकी १८९ रस्त्याची कामे पूर्ण झाली असून....
अधिकाऱ्यांची माहिती : समन्वय व संनियंत्रण समितीच्या सभेत खासदारांनी घेतला योजनांचा आढावा
गडचिरोली : पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत २४२ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैैकी १८९ रस्त्याची कामे पूर्ण झाली असून ४२ कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची त्रैैमासिक सभा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाच्या सभागृहात पार पडली. या सभेला खा. अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, आ. डॉ. देवराव होळी आ. क्रिष्णा गजबे, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, नगराध्यक्ष योगीता पिपरे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, डी. के. मेश्राम, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. जावळेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक जयंत बाबरे आदी उपस्थित होते.
सभेच्या सुरूवातीला मागील बैैठकीत झालेल्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. ज्या अधिकाऱ्यांनी अनुपालन अहवाल सादर करण्यास कुचराई केली आहे. त्यांच्यावर कारवाई करा, असे निर्देश खा. अशोक नेते यांनी दिले. पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेली कामे ६ ते ७ वर्षांपूर्वीचे आहेत. या कालावधीत खर्चात वाढ झाली असल्याने कामांचे फेरप्रस्ताव तयार करा व ती कामे आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करा, अशी सूचना खा. नेते यांनी केली. पूर्ण झालेल्या रस्त्यांच्या कामाची यादी उपलब्ध करून द्यावी, सदर यादी छायाचित्रासह जिल्ह्याच्या संकेतस्थळावर टाकण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नायक यांनी दिले.
नगर पंचायतीची स्थापना होण्यापूर्वी रोहयोंतर्गत जी कामे करण्यात येत होती ती कामे नगर पंचायत स्थापन झाल्यानंतर बंद पडली आहेत. त्यामुळे बहुतांश कामे अर्धवटच राहीली आहेत. या कामांना शासनस्तरावरून आदेश प्राप्त झाल्याशिवाय पूर्ण करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आमदारांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून ही कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. रामाळा- वैरागड मार्गासह १० मार्गांचे काम अपूर्ण राहिले आहेत. ते पूर्ण करावे, अशा सूचना आ. क्रिष्णा गजबे यांनी दिल्या. स्वच्छ भारत अभियानाचे काम अधिक चांगल्या पद्धतीने करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव केला जाईल. देसाईगंज तालुका हागणदारीमुक्त झाला आहे. इतरही तालुके हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे, असे निर्देश खासदारांनी दिले. यावेळी सर्व योजनांचा आढावा घेण्यात आला. सभेला नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)