नवेगाव माल पाणी साठवण बंधारा बांधकाम पूर्णत्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:37 AM2021-04-07T04:37:36+5:302021-04-07T04:37:36+5:30
चामोर्शी : तालुक्यातील नवेगाव माल येथील सगणापूर गावाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या केशव ठेमस्कर यांच्या शेताजवळ असलेल्या नाल्यावर पाणी साठवण ...
चामोर्शी : तालुक्यातील नवेगाव माल येथील सगणापूर गावाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या केशव ठेमस्कर यांच्या शेताजवळ असलेल्या नाल्यावर पाणी साठवण बंधारा बांधकाम करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य कविता भगत यांनी सदर बंधारा बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला हाेता. शेतकऱ्यांना सोयीचे होईल असा पाणी साठवण बंधारा पूर्णत्वास आला असून तो परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.
दरवर्षी या नाल्यातून पाणी वाया जात होते. शेतकऱ्यांना दरवर्षी खरीप हंगामात पाणीटंचाईमुळे उभी पिके करपून जायची. शेतकऱ्यांना गरजेनुसार पिकाला पाणी देता यावे यासाठी सर्वसाधारण योजना २०१९-२० अंतर्गत बंधारा बांधकाम करण्यासाठी ७ लाख ५४ हजार ४९२ रुपयांचा निधी उपलब्ध झाला. त्यानुसार या साठवण बंधारा बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य कविता भगत यांनी दोन महिन्यांपूर्वी केले. अल्पावधीतच बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले. त्यामुळे या भागातील जवळपास १५ हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आले आहे. शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्या भागातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला तर त्या भागातील विकासकामे होण्यास वेळ लागत नाही. जिल्हा परिषद सदस्य कविता भगत यांनी यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला पाण्याची सोय उपलब्ध झाली.