निवडणुकीच्या प्रभाग पद्धतीला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:40 AM2021-09-26T04:40:20+5:302021-09-26T04:40:20+5:30

गडचिराेली : मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये गडचिराेली नगरपालिकेत भाजपला बहुमत मिळाल्याने या पक्षाची एकहाती सत्ता प्राप्त झाली. मागील निवडणुकीतही प्रभाग ...

Composite response to the ward system of elections | निवडणुकीच्या प्रभाग पद्धतीला संमिश्र प्रतिसाद

निवडणुकीच्या प्रभाग पद्धतीला संमिश्र प्रतिसाद

Next

गडचिराेली : मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये गडचिराेली नगरपालिकेत भाजपला बहुमत मिळाल्याने या पक्षाची एकहाती सत्ता प्राप्त झाली. मागील निवडणुकीतही प्रभाग पद्धती हाेती. मध्यंतरीच्या काळात वाॅर्ड पद्धतीने निवडणुका हाेणार असल्याच्या हालचाली हाेत्या. मात्र, राज्य निवडणूक आयाेगाने प्रभाग पद्धतीने आगामी नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्याचे स्पष्ट केले असून, त्याचे परिपत्रक काढले आहे. गडचिराेली शहरातील प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून या पद्धतीचे स्वागत केले जात असून, लहान पक्ष व अपक्ष उमेदवारांची झाेप उडाली आहे.

गडचिराेली नगरपालिकेत एकूण १२ प्रभाग असून, २५ नगरसेवक आहेत. गाेकुलनगर प्रभाग क्र. १२ मध्ये तीन नगरसेवक आहेत व उर्वरित ११ प्रभागांमध्ये प्रत्येकी दाेन नगरसेवक आहेत.

बाॅक्स...

पालिकेतील सध्याची स्थिती

गडचिराेली नगरपालिकेत पक्षीय बलाबल पाहिले असता, २३ नगरसेवक भाजपचे आहेत. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचे २१ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर अपक्ष दाेन नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला. काॅंग्रेसचा एक व रासपचा प्रत्येकी एक नगरसेवक आहे.

बाॅक्स...

अशी राहू शकते पालिकेतील स्थिती

गडचिराेली ही ‘ब’ वर्गीय नगर पालिका आहे. या पालिकेत भाजप, काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे चारही प्रमुख राजकीय पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय घटक पक्ष व इतर लहान पक्ष आणि अपक्ष उमेदवारही पालिकेच्या रणांगणात उतरणार आहेत.

बाॅक्स...

एका मतदाराला द्यावे लागणार दाेघांना मत

नगर पालिकेच्या एका प्रभागात एकाच चिन्हावर दाेन उमेदवार नशीब आजमावणार आहेत. एका प्रभागातील सर्व मतदारांना दाेन उमेदवारांना मत द्यावे लागणार आहे. केवळ गाेकुलनगर हा प्रभाग तीन नगरसेवकांचा आहे. येथे मतदारांना तीन उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे.

काेट....

निवडणूक आयाेगाने नगर पालिका निवडणुकीसाठी प्रभाग पद्धती निश्चित केली असून, ही पद्धत चांगली आहे. नगर पालिकेची निवडणूक जवळ आली असल्याने आमच्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. गडचिराेली नगर पालिकेवर काॅंग्रेस पक्षाच्या नेतृत्वात सत्ता स्थापन करण्यासाठी आपण प्रयत्न करू. सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या काळात विकासाला कशी खीळ बसली, गटारलाईनच्या कामाने रस्त्याची वाट लागली. शहरवासीयांना पाठ, मान, कंबरदुखीचा माेठा त्रास झाला, हे सर्व मतदारांपुढे मांडणार आहे.

- सतीश विधाते, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक, काॅंग्रेस

....................

प्रभाग पद्धती ही चांगली पद्धत असून, आम्ही सर्व शिवसैनिक मिळून पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार आहाेत. स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लाेकहिताचे अनेक निर्णय घेतले. शिवाय जिल्हा विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला. पक्षाच्या जिल्हा व वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात गडचिराेली पालिकेवर भगवा फडकविण्याची आम्हाला चांगली संधी आहे.

- रामकिरीत यादव, शहर प्रमुख, शिवसेना

.............

गडचिराेली नगर पालिकेवर भाजपची एकहाती सत्ता असल्याने विकासाची माेठमाेठी कामे झाली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने गडचिराेली शहराच्या विकासासाठी कधी नव्हे इतका माेठा निधी गडचिराेली पालिकेला पहिल्यांदाच प्राप्त झाला. भाजपच्या काळातील शहर विकासच आम्हाला पुन्हा संधी देणार, असा विश्वास आहे.

- मुक्तेश्वर काटवे, शहर प्रमुख, भाजप

Web Title: Composite response to the ward system of elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.