२८ विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे
By admin | Published: January 14, 2017 12:57 AM2017-01-14T00:57:28+5:302017-01-14T00:57:28+5:30
दुर्गम गावातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान प्राप्त करता यावे, या हेतूने प्राणहिता पोलीस मुख्यालयात स्थित सीआरपीएफ ...
सीआरपीएफचा पुढाकार : अहेरी व भामरागड तालुक्यातील विद्यार्थ्यांचा समावेश
अहेरी : दुर्गम गावातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान प्राप्त करता यावे, या हेतूने प्राणहिता पोलीस मुख्यालयात स्थित सीआरपीएफ ३७ बटालीयनच्या वतीने सिव्हिक अॅक्शन कार्यक्रमांतर्गत अहेरी व भामरागड तालुक्यातील २८ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे दिले जाणार आहेत.
बटालीयनचे कमांंडंट श्रीराम मीना यांच्या पुढाकाराने भामरागड तालुक्यातील लाहेरी, धोडराज, नारगुंडा, कोठी तसेच अहेरी तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण घेता यावे याकरिता अहेरी येथे एमएससीआयटी संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन बटालीयनचे द्वितीय कमान अधिकारी जितेंद्रकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यातील २८ विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उद्घाटनप्रसंगी बटालीयनचे सीएमओ डॉ. सी. एम. नुगली, सहायक कमांडंट अशोककुमार रिअल, तहसीलदार प्रशांत घोरूडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, अहेरीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, एसबीआयचे शाखा व्यवस्थापक शिवराम खेडूलकर, पं. स. सदस्य दुर्याेधन व नागरिक उपस्थित होते. दुर्गम गावातील नागरिकांनी सीआरपीएफमार्फत उपलब्ध करून दिलेल्या संगणक प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा व आपली प्रगती साधावी, असे आवाहन अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)