रेतीअभावी रखडली काँक्रीट रस्त्यांची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 05:00 AM2020-06-15T05:00:00+5:302020-06-15T05:00:58+5:30
गडचिरोली शहरात २०१७-१८ या वर्षात १५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. यातून सात सिमेंट काँक्रीटचे मार्ग व एक डांबरी मार्ग मंजूर केला आहे. २०१८-१९ मध्ये प्राप्त १५ कोटी रुपयांच्या निधीमध्ये ३२ कामे हाती घेतली आहेत. यातील १९ कामे सुरू झाली आहेत. तर १३ कामे अजुनही सुरू झाली नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहरात विविध योजनांतर्गत सुमारे ३० कोटी रुपयांची रस्त्याची कामे मंजूर आहेत. यातील काही रस्ते सिमेंट काँक्रीटचे आहेत. सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनविण्यासाठी रेती हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र पावसाळ्याला सुरूवात झाली असतानाही यावर्षी अजूनपर्यंत रेती घाटांचे लिलाव झाले नाही. रेती मिळत नसल्याने सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे रखडली आहेत.
मागील वर्षीपासून रेतीच्या घाटांना परवानगी देण्याचे अधिकार राज्यस्तरीय समितीकडे सोपविले आहेत. राज्यस्तरीय समितीचे रेती घाट मंजुरीकडे दुर्लक्ष होत असल्याने रेती घाटांचे लिलाव वेळेवर होत नाही. जवळपास डिसेंबर महिन्यापासून बांधकामांना सुरूवात होते. त्यामुळे रेती घाटांची लिलाव किमान मार्च ते एप्रिल या कालावधीत होणे आवश्यक आहे. दोन वर्षांच्या पूर्वी जिल्हास्तरीय समितीकडे रेती घाटांना परवानगी देण्याचे अधिकार होते. त्यावेळी रेती घाटांचे लिलाव मार्च-एप्रिल महिन्यातच आटोपत होते. मात्र मागील वर्षीपासून राज्यस्तरीय समितीकडे अधिकार सोपविल्याने रेती घाटांचे लिलाव होण्यास विलंब होत आहे. यावर्षी आता पावसाळ्याला सुरूवात झाली असतानाही अजूनपर्यंत रेती घाटांचे लिलावच झाले नाहीत.
गडचिरोली शहरात २०१७-१८ या वर्षात १५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. यातून सात सिमेंट काँक्रीटचे मार्ग व एक डांबरी मार्ग मंजूर केला आहे. २०१८-१९ मध्ये प्राप्त १५ कोटी रुपयांच्या निधीमध्ये ३२ कामे हाती घेतली आहेत. यातील १९ कामे सुरू झाली आहेत. तर १३ कामे अजुनही सुरू झाली नाहीत.
यातील काही कामे खडीकरण, डांबर व सिमेंट काँक्रीटचे आहेत. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात रेतीची आवश्यकता भासते. चोरीची रेती महाग राहते. तसेच कंत्राटदाराला बिल काढतेवेळी रेतीच्या टीपी सुध्दा जोडाव्या लागतात. चोरी करणारे टीपी देत नाही. त्यामुळे चोरीच्या रेतीने बांधकाम करणे कंत्राटदाराला कठीण होत असल्याने अनेकांनी रस्त्यांचे काम थांबविले असल्याचे दिसून येते.
चोरीची रेती पोहोचली सात हजार रुपयांवर
मध्यंतरी महसूल विभागाच्या तालुकास्तरीय पथकाने मोहीम उघडून रेती चोरणाऱ्या २० पेक्षा अधिक ट्रॅक्टर जप्त केल्या. त्यानंतर रेती चोरीची मोहीम थंडावली आहे. महसूल विभाग पुन्हा मोहीम सुरू करेल, या भितीमुळे रेती चोरण्याची हिंमत रेती तस्कर करीत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी रेतीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. याचा गैरफायदा काही निवडक रेती तस्करांकडून घेतला जात असून सात हजार रुपये ब्रास दराने रेतीची विक्री केली जात आहे. यामुळे एवढी महागडी रेती खरेदी करताना घर बांधकाम करणाऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडत आहे. रेती घाटांचा लिलाव न झाल्याने शासनाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे.
रस्त्यांची दुरवस्था
इंदिरानगरातील मुख्य मार्ग सिमेंट काँक्रीटचा बनविण्याचे मंजूर आहे. सदर कंत्राटदाराने एक महिन्यापूर्वी रस्त्यावरचे डांबर जेसीबीच्या सहाय्याने काढून फेकले. त्यामुळे रस्त्यावर गिट्टी पसरली आहे. नागरिकांची ओरड सुरू झाल्यानंतर १५ दिवसांपूर्वी मुरूम आणून टाकला. मात्र तो पसरविला नाही. त्यामुळे रस्त्यावरची गिट्टी कायम आहे. तसेच अनेक ठिकाणी खड्डेही पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये आता पाणी साचत आहे. तसेच रस्त्यावर चिखल निर्माण झाला आहे. रस्ता बांधकामाला विलंब होता तर जुना डांबरी रस्ता का खोदला, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्याबाबत नगर परिषदेने आदेश द्यावे, अशी मागणी आहे. शहरातील इतरही रस्त्यांचे हेच हाल आहेत.