एकाच जागेवर उभ्या राहून बसची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:26 AM2021-06-03T04:26:08+5:302021-06-03T04:26:08+5:30
गडचिराेली : संचारबंदीमुळे मागील दीड महिन्यापासून बससेवा प्रभावित झाली आहे. दिवसाला दाेन ते चारच गाड्या साेडल्या जातात. उर्वरित एसटी ...
गडचिराेली : संचारबंदीमुळे मागील दीड महिन्यापासून बससेवा प्रभावित झाली आहे. दिवसाला दाेन ते चारच गाड्या साेडल्या जातात. उर्वरित एसटी बसेस आगारातच उभ्या आहेत. काेणतेही वाहन अनेक दिवस उभे राहिल्यास ते आणखी खराब हाेते. एसटी बसचीही तीच अवस्था हाेत चालली आहे.
गडचिराेली आगारात जवळपास १०० बसेस आहेत. संचारबंदीच्या कालावधीतही ५० टक्के प्रवाशी बसवून, बससेवा सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, जिल्हाबंदी असल्याने प्रवाशी मिळत नाही, तसेच ग्रामीण भागातीलही नागरिक शहरात येत नसल्याने बसला प्रवाशी मिळत नव्हते. त्यामुळे १५ एप्रिलपासून बससेवा चांगलीच प्रभावित झाली आहे. बहुतांश बसेस आगारातच उभ्या आहेत. बॅटरी, ऑइल खराब हाेऊ नये, यासाठी काही दिवसाआड बसेस सुरू केल्या जात आहेत, यासाठी आगाराला खर्च येत आहे.
बाॅक्स....
दरवाजे तुटले
काही बसेसचे दरवाजे तुटले आहेत. मागील दीड महिन्यापासून बससेवा बंद हाेती. त्यामुळे तुटलेले दरवाजे दुरुस्त करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांकडे वेळ आहे. मात्र, पैसे नसल्याने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
बाॅक्स....
टायरची हवा कमी
बसमधील काही टायरची हवा कमी आहे. त्यामुळे टायर खराब हाेण्याचा धाेका निर्माण झाला आहे.
बाॅक्स...
वर्षातून आठ महिनेच रस्त्यावर
मार्च, २०२०पासून काेराेनाचे संकट सुरू आहे. २०२० मध्ये मार्च ते जूनपर्यंत बससेवा बंद हाेती. त्यानंतर, काही प्रमाणात बससेवा सुरू झाली. मात्र, फारसे प्रवाशी मिळत नव्हते.
बाॅक्स...
आता येणार लाखाेंचा खर्च
बससेवा पुन्हा सुरू करताना, अनेक बसेसच्या बॅटऱ्या, ऑइल व इतर भाग बदलवावे लागणार आहेत. त्यामुळे एसटी रस्त्यावर धावण्यासाठी लाखाे रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.
बाॅक्स...
आधीच दुष्काळ
बससेवा बंद असल्याने आगाराचे उत्पन्न ठप्प पडले आहे. अशातच लाखाे रुपयांचा खर्च एसटी महामंडळालाही येणार आहे. त्यामुळे हा खर्च कुठून करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बाॅक्स...
जिल्ह्यातील एकूण आगार - २
एकूण बसेस - १४९