यावर्षी खरीप पिकांची स्थिती समाधानकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 06:00 AM2019-11-02T06:00:00+5:302019-11-02T06:00:25+5:30
ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत धानाची स्थिती सर्वसाधारण चांगली होती. हलके धान परिपक्व होण्याच्या मार्गावर असताना पाऊस कहर करीत आहे. त्यामुळे १५ दिवसांचा कालावधी उलटूनही अनेकांनी धान कापले नाही. कापलेल्या धानाच्या कडपा बांधितच कुजत आहेत. वादळवाऱ्यामुळे जड धान कोसळून पडले आहे. त्यामुळे याही धानाच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महसूल व कृषी विभागाने आॅक्टोबर महिन्यात केलेल्या पाहणीत पीक परिस्थिती समाधानकारक असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची पैसेवारी ६७ पैसे आढळून आली आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे १ लाख ७७ हजार ८८१ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने धानाचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. यावर्षी सुरूवातीपासून चांगला पाऊस पडत असल्याने धानपिकाची स्थिती चांगली आहे. रोगराई सुद्धा कमी प्रमाणात आहे. राज्यभरातील खरीप पिकांची नेमकी स्थिती कशी आहे, याचा अंदाज येण्यासाठी सप्टेंबर महिन्यात नजर अंदाज पैसेवारी काढली जाते. याला हंगामी पैसेवारी सुद्धा असे म्हटले आहे. या पैसेवारीचा अहवाल १ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाला. यामध्ये जिल्ह्यातील खरीप पिकांची पैसेवारी सरासरी ६९ टक्के आढळून आली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पाहणी करण्यात आली. त्यामध्ये पिकांची स्थिती थोडी कमकुवत आढळून आली. त्यामुळे सरासरी पैसेवारी ६७ टक्के दाखविण्यात आली आहे. विशेष म्हणजे १२ ही तालुक्यातील पैसेवारी ५० टक्केपेक्षा अधिक आढळून आली आहे. ५० टक्केपेक्षा अधिक उत्पादन झाल्यास पीक परिस्थिती सर्वसाधारण चांगली असल्याचा अंदाज शासनाकडून वर्तविला जाते. ५० टक्केपेक्षा अधिक पैसेवारी असल्यास संबंधित जिल्हा किंवा तालुक्याला शासनाकडून दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले जात नाही. कृषी विभाग व महसूल विभागाने केलेल्या पाहणीत सर्वाधिक चांगली पिकांची स्थिती देसाईगंज तालुक्यातील असल्याचे म्हटले आहे. या तालुक्याची पैसेवारी ७६ दाखविण्यात आली आहे. तर भामरागड तालुक्यातील पैसेवारी सर्वात कमी ५७ एवढी दाखविण्यात आली आहे.
परतीच्या पावसामुळे अंतिम पैसेवारी घटण्याची शक्यता
ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत धानाची स्थिती सर्वसाधारण चांगली होती. हलके धान परिपक्व होण्याच्या मार्गावर असताना पाऊस कहर करीत आहे. त्यामुळे १५ दिवसांचा कालावधी उलटूनही अनेकांनी धान कापले नाही. कापलेल्या धानाच्या कडपा बांधितच कुजत आहेत. वादळवाऱ्यामुळे जड धान कोसळून पडले आहे. त्यामुळे याही धानाच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. सुरूवातीपासून जवळपास अडीच महिने पाऊस पडला. त्यामुळे सोयाबीन, कापूस पिकाचीही वाढ खुंटली आहे. काही कपाशीचे पीक पाण्यामुळे कुजून गेले. नोव्हेंबर महिन्यात पिकांची अंतिम पाहणी केली जाणार आहे व त्याचा अहवाल १ डिसेंबर रोजी प्रकाशित केला जाणार आहे. या अंतिम पाहणीत पैसेवारी घटण्याची शक्यता आहे.