कार्मेल हायस्कूलमध्ये गोंधळ

By admin | Published: June 4, 2017 12:37 AM2017-06-04T00:37:49+5:302017-06-04T00:37:49+5:30

येथील कार्मेल हायस्कूलमधून एकूण १५२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यापैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Confusion in Carmel High School | कार्मेल हायस्कूलमध्ये गोंधळ

कार्मेल हायस्कूलमध्ये गोंधळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येथील कार्मेल हायस्कूलमधून एकूण १५२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यापैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र फॉर्मेटिव्ह असेसमेंटमध्ये (एफए) अत्यंत कमी गुण मिळाल्याचा आरोप होत आहे. यासाठी शाळेचे प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करून पालक व विद्यार्थ्यांनी केला. दिवसभर शाळेच्या आवारात ठाण मांडून याबद्दल मुख्याध्यापक व शाळा प्रशासनाला जाब विचारत होते.
ज्या विद्यार्थ्यांना कम्युनिटीव्ह असेसमेंटमध्ये (एसए) ए-१ गुण मिळाले आहेत. त्या विद्यार्थ्यांना एफएमध्ये बी २, सी २, डी २, ई पर्यंतची श्रेणी देण्यात आली आहे. एफएचे गुण आॅनलाईन पध्दतीने चेन्नई येथील सीबीएसईच्या बोर्डाकडे शाळेतून पाठवावे लागतात. मात्र कदाचित शाळेने गुणच पाठविले नसावे किंवा पाठविलेले गुण बोर्डाला मिळाले नसावे, असाही आरोप पालकांनी केला आहे. गुण पाठविल्यानंतर ते बोर्डाला मिळाले किंवा नाही, याची शहानिशा करणे मुख्याध्यापक व शाळा प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र निकाल लागेपर्यंत याबद्दल काहीही चौकशी शाळेने केली नाही. निकाल घोषीत झाल्यानंतर एफएमध्ये अत्यंत कमी गुण मिळाले असल्याचे लक्षात येताच पालक व विद्यार्थ्यांना धक्काच बसला. पालकांनी शाळेमध्ये जमा होऊन जे गुण आपल्याकडून पाठविण्यात आले, त्याची ओसी आपल्याला देण्यात यावी, अशी मागणी केली. मात्र संबंधित शिक्षक नसल्याने आपण ओसी उपलब्ध करून देऊ शकत नाही, अशी भूमिका प्राचार्य जीनेश यांनी घेतली. यामुळे पालकवर्गाचा संताप अनावर झाला. शाळेतच पत्रकार परिषद घेऊन झालेल्या प्रकाराबाबतची माहिती पत्रकारांना दिली. विद्यार्थ्यांना कमी गुण मिळण्यासाठी शाळेचे प्रशासनच जबाबदार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी व शाळा प्रशासनाची मान्यता काढावी, अशी मागणी केली. शाळेच्या चुकीसाठी विद्यार्थ्यांना वेठीस न धरता सीबीएसई बोर्डाने शाळेकडून योग्य गुणांची यादी शाळेकडून मागवून त्यांचा समावेश करावा व गुणांमध्ये बदल करावा, अशी मागणी केली आहे. सायंकाळी ४ वाजतानंतर पालक आक्रमक झाले. त्यामुळे शाळा प्रशासनाने पोलिसांना बोलावून सर्व पालकांना शाळेच्या आवारातून बाहेर काढले. गुणांमध्ये झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचा निकालही शाळा प्रशासनाने शनिवारी जाहीर केला नाही. केवळ १०० टक्के निकाल लागला आहे, अशी माहिती प्राचार्य जीनेश यांनी दिली.

विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले असल्याने काही तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणतीच शाळा अत्यंत कमी गुण टाकून स्वत:च्या विद्यार्थ्यांचे नुकसान करून घेणार नाही. विद्यार्थ्यांना शाळेने पाठविलेले गुण मिळावे, यासाठी शाळेच्या वतीने सीबीएसई परीक्षा बोर्डाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. आॅनलाईन पध्दतीने जाहीर झालेला निकाल अंतिम राहत नाही. मार्कशीट बनेपर्यंत त्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. पालकांनी धीर धरावा.
- जीनेश, प्राचार्य, कारमेल हायस्कूल गडचिरोली

Web Title: Confusion in Carmel High School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.