मृत गाईंच्या आकड्यात गोलमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 05:00 AM2019-12-26T05:00:00+5:302019-12-26T05:00:35+5:30
गाई मरण पावल्या असल्या तरी किती गायी मरण पावल्या आणि किती विकण्यात आल्या याचा नेमका आकडा पशुसंवर्धन विभागाकडे नाही. विशेष म्हणजे मरण पावलेल्या गाईंपैकी २३ डिसेंबरपर्यंत केवळ ७ गाईंचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे उर्वरित २३९ गायींपैकी नेमक्या किती गाई मरण पावल्या याचा आकडा अजूनही गुलदस्त्यात आहे. यात बºयाच गायी मरण पावल्याचा देखावा करून प्रत्यक्षात त्या तेथून लांबवल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीने आरमोरीजवळील शिवणी येथे ठेवलेल्या फ्रिजवाल गाईंपैकी दोन महिन्यात तब्बल २४६ गाई गायब झाल्या आहेत. त्यापैकी काही गाई मरण पावल्या असल्या तरी किती गायी मरण पावल्या आणि किती विकण्यात आल्या याचा नेमका आकडा पशुसंवर्धन विभागाकडे नाही. विशेष म्हणजे मरण पावलेल्या गाईंपैकी २३ डिसेंबरपर्यंत केवळ ७ गाईंचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे उर्वरित २३९ गायींपैकी नेमक्या किती गाई मरण पावल्या याचा आकडा अजूनही गुलदस्त्यात आहे. यात बºयाच गायी मरण पावल्याचा देखावा करून प्रत्यक्षात त्या तेथून लांबवल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.
प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीला पुण्यावरून ३८३ गायी-वासरे मिळाली होती. वाहतुकीदरम्यान त्यातील १५ गायी आणि १६ वासरे मरण पावली. दि.१२ ते १४ ऑक्टोबर यादरम्यान त्या गायी आरमोरीत दाखल झाल्या, त्यावैळी ३५२ गाई-वासरे जिवंत होती. १४ डिसेंबरला जनावरांची मोजणी केली त्यावेळी २७६ गाई आणि १० वासरे अशी २८६ जनावरे जिवंत होती. त्यानंतर दि.२४ डिसेंबरला शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष गाई ताब्यात घेतल्या त्यावेळी केवळ १०६ गाई उपलब्ध होत्या.
आरमोरीत जिवंत आणण्यात आलेल्या ३५२ गाईंपैकी केवळ १०६ गायी उपलब्ध झाल्यामुळे उर्वरित २४६ गायींचे नेमके काय झाले? हे जाणून घेणे शेतकऱ्यांसोबतच प्रशासनासाठीही महत्त्वाचे झाले आहे. मात्र याबाबत आरमोरीचे तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.किशोर पराते यांना विचारले असता दोन दिवसांपूर्वीपर्यंत आपण ७ गाईंचे शवविच्छेदन केले असल्याचे ते म्हणाले. उर्वरित मृत गाईंचे शवविच्छेदन का झाले नाही? असे विचारले असता गाई मरण पावल्याची माहिती आपल्याला कंपनीकडून दिलीच जात नव्हती, तिथे काम करणारे लोक दोन दिवसांनंतर गाई मरण पावल्याचे सांगत होते. त्यामुळे त्या गायींची आधीच परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याने शवविच्छेदन होऊ शकले नसल्याचे डॉ.पराते म्हणाले.वास्तविक हा सर्व प्रकार संशयास्पद असून गायी खरोखर किती मेल्या आणि किती गायब केल्या गेल्या (विकल्या) याची सखोल चौकशी करावी आणि ही गडबड करणाºयांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केली जात आहे.दरम्यान जिल्हाधिकाºयांच्या आदेशानंतर कंपनीने विकलेल्या काही गाई परत आणण्यात आल्या आहेत.
लाखोंच्या गाईंची किंमत कोणाकडून वसूल करणार?
लष्कराच्या दुधाळू फ्रिजवाल गायींची किंमत शासनाच्या नोंदी प्रतिगाय ४० हजार रुपये असली तरी प्रत्यक्षात ती गाय ५० ते ६० हजार रुपये किमतीची आहे. परंतू जवळजवळ फुकटात मिळालेल्या कोटीच्या घरातील गायींची प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीने योग्य देखभाल केलीच नाही. त्यांना ठेवण्यासाठी शेडही बनविले नाही. खाण्यास योग्य प्रकारे चाराही दिला नाही. परिणामी अनेक गायी मरण पावल्या. लाखो रुपये किमतीच्या या शासनाच्या गायी मरण्यासाठी आणि त्यांच्या गायब होण्यासाठी जबाबदार धरून त्या गायींची किंमत प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीकडून वसूल करणार का? किंवा त्या कंपनीवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कायदेशिर कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कुपोषणामुळेच गाईंचे मरण
ज्या गाई मरण पावल्या त्या कुपोषणामुळेच मरण पावल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. याचा अर्थ कंपनीने त्यांची योग्य देखभाल केली नाही हे स्पष्ट आहे. गाई शेतकºयांच्या ताब्यात देण्याच्या आधीच मरण पावणे किंवा गायब होणे यासाठी सर्वस्वी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीच जबाबदार असल्याने त्या कंपनीवर कायदेशिर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.