आरमोरीतील कोंडलेल्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 05:00 AM2021-07-08T05:00:00+5:302021-07-08T05:00:33+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून काही भागात अतिक्रमण कायम होते. शहरातील अनेक रस्त्यावर दुकानदार आणि काहींनी फुटपाथवर शेड बांधून अतिक्रमण केले होते. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत नगर परिषदेने शहरात मुनादी देऊन सार्वजनिक रस्त्यावर ज्यांचे अतिक्रमण आहे त्यांनी ते तत्काळ काढावे, अशी सूचना दिली होती. मात्र व्यावसायिकांनी त्याकडे दुर्लक्ष करून अतिक्रमण काढले नव्हते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : स्थानिक नगर परिषदेने सोमवार दि. ५ जुलैपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेऊन शहरातील रस्त्यांवर अनेक व्यावसायिक आणि नागरिकांनी केलेले अतिक्रमण काढले. बुधवारी ही मोहीम थंडावली असली तरी दोन दिवसात ४० वर बांधकामे पाडण्यात आली. यामुळे कोंडलेल्या रस्त्यांनी बऱ्यापैकी मोकळा श्वास घेतला. काही दिवसानंतर पुन्हा ही मोहीम राबविली जाणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून काही भागात अतिक्रमण कायम होते. शहरातील अनेक रस्त्यावर दुकानदार आणि काहींनी फुटपाथवर शेड बांधून अतिक्रमण केले होते. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत नगर परिषदेने शहरात मुनादी देऊन सार्वजनिक रस्त्यावर ज्यांचे अतिक्रमण आहे त्यांनी ते तत्काळ काढावे, अशी सूचना दिली होती. मात्र व्यावसायिकांनी त्याकडे दुर्लक्ष करून अतिक्रमण काढले नव्हते.
ही मोहीम मुख्याधिकारी डॉ.माधुरी सलामे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता अविनाश बंडावार, पाणी व स्वच्छता अभियंता नितीन गौरखेडे, कार्यालय अधीक्षक ओसीन मडकाम, कर निरीक्षक बी.आर.पिंपळे, लेखापाल संजय शेळके, लिपीक योगेश दुमाने, गिरीश बांते, राजू कांबळे आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी राबविली.
हे मार्ग झाले मोकळे
- नगर परिषद प्रशासनाने साेमवारपासून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली व सार्वजनिक रस्त्यावर व नालीवर असलेले अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने काढून रस्ते मोकळे केले. पहिल्या दिवशी जुन्या बसस्थानकापासून तर नगर परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील व्यावसायिक व छोट्या दुकानदारांनी लावलेले टिनाचे शेड, झोपड्यांचे अतिक्रमण काढले.
- दुसऱ्या दिवशी मंगळवारला इंदिरा गांधी चौकापासून गुजरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या दुकानदारांनी केलेले अतिक्रमण काढण्यात आले. शहरात सर्वाधिक वाहतुकीची कोंडी या रस्त्यावर होत होती.