संमेलनाच्या निमित्ताने एकवटल्या महिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:59 PM2019-03-13T22:59:02+5:302019-03-13T22:59:16+5:30
भामरागड इलाका परिसरातील ग्रामसभांच्या वतीने १२ मार्च रोजी धोडराज येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात महिला अधिकार संमेलन व जाहीर सभा घेण्यात आली. या संमेलनाच्या निमित्ताने शेकडो महिला एकत्र आल्या होत्या. या संमेलनात हुंडाबळी, व्यसन व महिला सशक्तीकरणावर मंथन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : भामरागड इलाका परिसरातील ग्रामसभांच्या वतीने १२ मार्च रोजी धोडराज येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात महिला अधिकार संमेलन व जाहीर सभा घेण्यात आली. या संमेलनाच्या निमित्ताने शेकडो महिला एकत्र आल्या होत्या. या संमेलनात हुंडाबळी, व्यसन व महिला सशक्तीकरणावर मंथन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भामरागड पंचायत समितीच्या सभापती प्रेमिला कुडयामी होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोकबिरादरी प्रकल्प शाळेच्या संचालिका डॉ. अनघा आमटे, धोडराज पोलीस मदत केंद्राचे पोलीस निरिक्षक आम्रपाली, बचत गटाचे दुधे, संजय साळवे, जयश्री लेकामी, जि.प. सदस्य ग्यानकुमारी कौशी, सुखराम मडावी, जि.प. सदस्य अॅड. लालसू नोगोटी, सोमीबाई कोडापे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रेमिला कुड्यामी म्हणाल्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाचे दार खुले केले. महिलांना मिळवून दिलेला सन्मान व अधिकार याबाबत माहिती दिली. आदिवासी महिलांनी शिक्षणाच्या भरवशावर विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी डॉ. अनघा आमटे यांनी आदिवासी विवाह पध्दती चांगली असून आदिवासी समाजातील प्रत्येक विवाह सोहळा समाजाच्या सहकार्यातून पार पडत असतो. त्यामुळे इतर समाजानेही हुंडा पध्दती बंद केली पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मुक्तीपथ तालुका प्रेरक चिन्नू महाका यांनी केले तर आभार रमेश पुंगाटे यांनी मानले. यशस्वीतेसाठी भामरागड पट्टी, पारंपारिक गोटूल समिती व पट्टीतील सर्व ग्रामसभा सदस्यांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे, यावेही ललिता मज्जी व ललिता कुसराम यांनी महिला अधिकार व हक्कांवर जनजागृतीपर गीत गायन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.