गडचिरोलीत काँग्रेस-राष्ट्रवादीला गतवैभवाची आस, भाजपात शह-काटशह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 01:32 PM2019-07-27T13:32:25+5:302019-07-27T13:33:02+5:30

आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसप्रमाणे भाजपमध्ये सुरू झालेल्या शह-काटशहच्या राजकारणात हे आमदार पुन्हा यशस्वी होतील का? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.

Congress-NCP looking for victory and war in tug of war in Gadchiroli | गडचिरोलीत काँग्रेस-राष्ट्रवादीला गतवैभवाची आस, भाजपात शह-काटशह

गडचिरोलीत काँग्रेस-राष्ट्रवादीला गतवैभवाची आस, भाजपात शह-काटशह

Next

मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी आणि आरमोरी हे तीनही मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच तीनही मतदार संघात भाजपने बाजी मारून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. विशेष म्हणजे हे भाजपचे तत्कालीन नवखे शिलेदार आता पुन्हा एकदा गड काबिज करण्यासाठी सरसावले आहेत. पण काँग्रेसप्रमाणे भाजपमध्ये सुरू झालेल्या शह-काटशहच्या राजकारणात हे आमदार पुन्हा यशस्वी होतील का? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीतून जुनेच पदाधिकारी पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज होऊन आपल्याला गतवैभव प्राप्त होईल, अशी आस लावून बसले आहेत.
सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन गडचिरोली मतदार संघात भाजपकडून लढणारे डॉ.होळी यांना यावेळी त्यांच्याच पक्षाकडून फटाके लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी खासदार नेते यांचे तिकीट कापण्यासाठी दबाव गट बनविला होता. पण त्यात यश आले नाही. त्यामुळे आता त्यांना तिकीट मिळू नये यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास जुने कार्यकर्ते प्रकाश गेडाम यांना भाजपकडून रिंगणात उतरविले जाऊ शकते. गेल्यावेळी या मतदार संघात दुसऱ्या क्रमांकाची मते राष्ट्रवादीला मिळाल्याने यावेळी ही जागा राष्टÑवादीच्या कोट्यात जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र काँग्रेसने आपला दावा सोडलेला नाही. लोकसभेसाठी इच्छुक असलेले काँग्रेसचे डॉ.नितीन कोडवते आता निदान विधानसभेत तरी तिकीट मिळावी म्हणून प्रयत्नशिल आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या पाठबळाने तिकीट मिळण्याची आशाही त्यांना आहे. जर तसे झाल्यास या मतदार संघातील चुरस वाढणार आहे.
आरमोरी मतदार संघावर सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, प्रकाश पोरेड्डीवार यांचे प्राबल्य राहिले आहे. पूर्वाश्रमीच्या या काँग्रेस नेत्यांनी त्यावेळी काँग्रेसच्या आनंदराव गेडाम यांना दोन वेळा आमदार बनविण्यात महत्वाची भूमिका बजावली. पण भाजपवासी झाल्यानंतर भाजपच्या कृष्णा गजबे या नवख्या उमेदवाराला निवडून आणून त्यांनी या मतदार संघावर आपलीच पकड असल्याचे दाखवून दिले. यावेळी हा मतदार संघ शिवसेनेच्या कोट्यात द्यावा यासाठी सेनेचे पदाधिकारी उड्या मारत असले तरी पोरेड्डीवार यांच्या मर्जीशिवाय तो मतदार संघ सेनेसाठी सोडला जाण्याची शक्यता नाही. काँग्रेसने चांगली प्रतिमा असलेला योग्य उमेदवार दिल्यास या मतदार संघातील मुकाबला रंगण्याची शक्यता आहे.
दक्षिण गडचिरोली म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावरील अहेरी मतदार संघावर आतापर्यंत अहेरीच्या आत्राम घराण्याची सत्ता आहे. जुन्या काळात विश्वेश्वरराव महाराज (आत्राम), सत्यवानराव महाराज असो, धर्मरावबाबा आत्राम असो की तिसºया पिढीतील विद्यमान आमदार अम्ब्रिशराव आत्राम असो, या भागातील नागरिकांसाठी पक्षापेक्षा राजघराण्यातील व्यक्तीला जास्त महत्व दिले आहे.
अम्ब्रिशराव आत्राम यांना साडेचार वर्षानंतर नुकतेच मंत्रीपद सोडावे लागले. त्यामुळे भाजपनेच त्यांचे खच्चीकरण सुरू केल्याचे वरवर म्हटले जात आहे. पण आपल्यालाच या मतदार संघातून पुन्हा भाजपचे तिकीट मिळणार असा अम्ब्रिशराव यांचा विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा यांना भाजपची आॅफर असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. जर तसे झाले तर अम्ब्रिशराव नाग विदर्भ समिती (नाविस) या आपल्या आजोबांपासून चालत आलेल्या बॅनरखाली निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. गेल्या १० वर्षांपासून पदापासून दूर असलेल्या धर्मरावबाबांनी पुन्हा एकदा गड काबिज करण्यासाठी कंबर कसली आहे. १० वर्षात दोन नवख्या उमेदवारांचे काम पाहिल्यानंतर लोक यावेळी पुन्हा आपल्याला कौल देतील असा विश्वास ठेवून ते कामाला लागले आहेत.
धर्मरावबाबा आणि अम्ब्रिशराव या दोन्ही राजघराण्यातील व्यक्तींच्या स्वभावात फरक असला तरी दोघांनाही मानणारा वर्ग त्या भागात आहे. या दोन आत्रामांशिवाय आदिवासी विद्यार्थी संघाच्या (आविसं) बॅनरखाली रिंगणात उतरून १० वर्षांपूर्वी निवडून आलेले दीपक आत्राम हेसुद्धा पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या जोरावर आपले नशिब आजमावणार आहेत. त्यामुळे मतदार संघातील लढतीत चुरस राहील.

Web Title: Congress-NCP looking for victory and war in tug of war in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.