राकाँकडून काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव
By admin | Published: January 11, 2017 02:08 AM2017-01-11T02:08:30+5:302017-01-11T02:08:30+5:30
लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दारूण पराभवानंतर नगर पालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस
भाजपला रोखण्यासाठी खेळी : जि.प., पं.स. क्षेत्राच्या जागा वाटपाबाबत अद्याप चर्चा नाही
गडचिरोली : लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दारूण पराभवानंतर नगर पालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला जबरदस्त हादरा बसल्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गडचिरोली जिल्ह्यात आघाडी करावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काँग्रेससमोर ठेवण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाकडूनही धर्मराबाबा आत्राम यांच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असल्याच्या बाबीला माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी दुजोरा दिला आहे.
गडचिरोली जिल्हा परिषदेत ५१ जागांसाठी व पंचायत समितीच्या १०२ जागांसाठी फेब्रुवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. विद्यमान स्थितीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे गडचिरोली जिल्हा परिषदेवर प्राबल्य आहे. २०१२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळे लढले होते. त्यावेळी काँग्रेसला १४ जागांवर यश मिळाले होते. त्यानंतर मदनी बोगामी यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने व बंडोपंत मल्लेलवार यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने काँग्रेसचे संख्याबळ १२वर आले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ ९ सदस्यांवरून एक जागा जिंकत १० वर पोहोचले. त्यावेळी शिवसेनेला दोन, भाजपला आठ, तत्कालीन युवाशक्ती आघाडीला सहा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला एक, नाग विदर्भ आंदोलन समितीला चार, दीपक आत्राम यांच्या आदिवासी विद्यार्थी संघाला तीन जागा मिळाल्या होत्या. तर तीन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते.
आता परिस्थिती मोठ्या प्रमाणावर बदललेली आहे. गेल्यावर्षी पार पडलेल्या नगर पंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने केवळ दोनच नगर पंचायतीवर सत्ता प्रस्तापित केली असली तरी त्यांची सदस्य संख्या ५० च्या घरात आहे. तर अलिकडेच पार पडलेल्या गडचिरोली व देसाईगंज नगर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस व राकाँचा पूरता फज्जा उडाला आहे. ही सर्व परिस्थिती पाहू जाता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही काँग्रेसने आघाडी करून निवडणूक लढावी, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रस्ताव आहे.
याबाबत काँग्रेसमध्येही विचारमंथन सुरू असल्याची माहिती आरमोरीचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी दिली आहे. काँग्रेस पक्षासह समविचारी पक्षासोबत युती करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस अनुकूल असल्याचे धर्मरावबाबा आत्राम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. काँग्रेस पक्षाने किती जागा लढायच्या व राकाँने किती जागा घ्यायच्या याबाबत अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती राकाँच्या सूत्रांनी दिली. केवळ आघाडीबाबतचा प्रस्ताव देण्यात आला आहे. अद्याप याबाबत चर्चाही झालेली नाही. मात्र ही आघाडी होईल, असे सुतोवाच राकाँकडून करण्यात आले आहे. काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते यांनीही राकाँसोबत आघाडी जि.प. निवडणुकीत तरी व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)
गण्यारपवार व दीपक आत्राम गटासोबत आघाडीची शक्यता मावळली
काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीचा प्रस्ताव येण्याआधी जिल्हा परिषदेचे बांधकाम व नियोजन सभापती अतुल गण्यारपवार व माजी आमदार दीपक आत्राम यांच्या गटासोबत आघाडी करण्याबाबत एक मतप्रवाह होता. मात्र गोंदिया येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला गेलेल्या शिष्टमंडळातील एका नेत्याने या दोन्ही गटासोबत आघाडी करण्यास स्पष्ट विरोध दर्शविला, अशी चर्चा काँग्रेसच्या गोटात आहे. त्यामुळे या दोन्ही गटांसोबत आघाडीचा प्रस्ताव बारगळल्याचे समजते. गण्यारपवारांकडून चामोर्शी तालुक्यात नऊ पैकी सहा जागांची मागणी करण्यात आली होती. ही मागणी पुढील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोणातून काँगे्रसला परवडणारी नव्हती. त्यामुळे गण्यारपवारांसोबत जि.प. निवडणुकीत हात मिळवणी करण्याच्या काँग्रेसच्या एका गटाच्या इच्छेवर पाणी फेरल्या गेले. त्यामुळे आता माजी आमदार दीपक आत्राम व जि.प.चे सभापती अतुल गण्यारपवार हे आपल्या गटासह जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात स्वतंत्रपणे उतरणार आहेत.
राकाँला अहेरी विधानसभा क्षेत्रात अधिक जागा मिळण्याची शकता
दोन काँग्रेसची जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आघाडी झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला अहेरी विधानसभा क्षेत्रात अधिक जागा दिल्या जाऊ शकतात. काँग्रेस सिरोंचा, भामरागड, मुलचेरा व एटापल्ली तालुक्यात काही जागा घेऊन उर्वरित जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ शकते, अशी शक्यता नाकारता येत नाही. तर आरमोरी विधानसभा क्षेत्रात कोरची भागात राष्ट्रवादी काँग्रेससाठी जागा सोडली जाऊ शकते व गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील तीन तालुके मिळून दोन ते चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्या जाऊ शकतात.