सुनेच्या बंडखोरीनंतरही काँग्रेस मोटवानींवरच फिदा

By admin | Published: December 30, 2016 01:48 AM2016-12-30T01:48:25+5:302016-12-30T01:48:25+5:30

नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान भगतसिंग वॉर्ड क्र. ९ ब ची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली होती.

Congress rebuffs Congress | सुनेच्या बंडखोरीनंतरही काँग्रेस मोटवानींवरच फिदा

सुनेच्या बंडखोरीनंतरही काँग्रेस मोटवानींवरच फिदा

Next

जिल्हा नेतृत्वाला दणका : हरीश मोटवानी यांना भगतसिंग वॉर्डातून काँग्रेसने दिली उमेदवारी
गडचिरोली : नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान भगतसिंग वॉर्ड क्र. ९ ब ची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली होती. या प्रभागाची निवडणूक प्रक्रिया नव्याने जाहीर केल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भगतसिंग वॉर्ड प्रभाग क्र. ९ ब मधून देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांचे चिरंजीव हरीश मोटवानी यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. मोटवानी कुटुंबातील सेजल मोटवानी यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसविरोधात बंडखोरी केल्यानंतरही काँग्रेस पक्षाने मोटवानी कुटुंबीयांवर हरीश मोटवानी यांना उमेदवारी देत मोठा विश्वास दाखविला असल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जेसा मोटवानी यांनी भगतसिंग वॉर्डातून यापूर्वी प्रतिनिधीत्व केले होते. सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळीही त्यांना येथून काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र राज्याचे दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याच्या प्रकरणात या प्रभागातील निवडणूक रद्द झाली होती. त्यानंतर मोटवानी यांनी आपल्या कुटुंबातील सेजल मोटवानी यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून मैदानात उतरविले. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विरूद्ध थेट बंडखोरी करित पक्ष उमेदवाराचा पराभव केला. त्यानंतर प्रभाग क्र. ९ ब च्या निवडणुकीत जेसा मोटवानी यांना उमेदवारी देऊ नये म्हणून स्थानिक तालुका काँग्रेस व जिल्हा काँग्रेस कमिटीनेही पक्षश्रेष्ठीकडे शिफारस केली होती.
जेसा मोटवानी यांना पक्षातून निलंबित करा, अशी गळही तालुका काँग्रेस कमिटीने घातली होती. मात्र काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीने जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. या चर्चेत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लक्षात घेऊन माणसे तोडणे योग्य होणार नाही, ते जोडून ठेवणेच पक्षाच्या हिताचे राहिल, असा मतप्रवाह समोर आला. त्यानंतर पक्षश्रेष्ठीने हरीश मोटवानी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले, अशी सूत्रांची माहिती आहे. हरीश मोटवानी यांचा उमेदवारी अर्ज भरताना जि.प.चे माजी सदस्य पी. आर. आकरे, नवनाथ धाबेकर, जेसा मोटवानी आदी उपस्थित होते. या प्रकारामुळे काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्वाला मोठा धक्का मानला जात आहे.

 

Web Title: Congress rebuffs Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.