काँग्रेसने रस्ता रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 01:18 AM2017-10-08T01:18:34+5:302017-10-08T01:18:46+5:30
मुलचेरा तालुक्यातील विविध मूलभूत समस्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष रवींद्र निर्मल शाहा यांच्या नेतृत्वात.....
लोकमत न्यूज नेटवर्क
मुलचेरा : मुलचेरा तालुक्यातील विविध मूलभूत समस्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष रवींद्र निर्मल शाहा यांच्या नेतृत्वात शनिवारी गणेशनगर-मुलचेरा मार्गावर रस्तारोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी सदर मार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारने डिझेल, पेट्रोल, गॅस सिलिंडरसह विविध जिवनावश्यक वस्तूंचे दर प्रचंड वाढविले आहेत. त्यामुळे मुलचेरा तालुक्याच्या दुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिक महागाईने हैराण झाले आहेत. मुलचेरा तालुक्यात शेतकºयांची संख्या मोठी आहे. अनेक शेतकरी दुष्काळ परिस्थितीमुळे कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे शासनाने छत्रपती शिवाजी सन्मान योजनेअंतर्गत तालुक्यातील सर्व शेतकºयांना संपूर्ण सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी मुलचेरा तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी केली.
दरम्यान काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात नारेबाजी केली. आंदोलनाची माहिती मिळताच मुलचेराचे तहसीलदार अनिरूद्ध कांबळे व नायब तहसीलदार समशेर पठाण हे आंदोलनस्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार कांबळे यांना मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष रवींद्र शाहा, उमेश पेढुकर, प्रमोद गोटेवार, राकेश आत्राम, कृष्णा परचाके, उमेश कडते, ऋषी सडमेक, बिधान रॉय, बादल शाहा, शंकर हालदार, देवकुमार रॉय, जहर हालदार, शुभम शेंडे, प्रकाश मंडल, संजीव सरकार, सुशांत सरदार, खोगन गाईन, दिनेश बहादूर, मधुसुदन गाईन, शत्रृघ्न वर्मन, सुकुमार साना, समीर डे, राजू दास आदी उपस्थित होते.
यापूर्वीही मुलचेरा तालुक्यात काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात अनेकदा आंदोलने करण्यात आली. मात्र विद्यमान शासन व प्रशासनाने समस्या मार्गी लावण्याबाबत कार्यवाही केली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी चक्क गणेशनगर-मुलचेरा मार्ग काही वेळ रोखून धरला.त्यामुळे येथील वाहतुक ठप्प झाली होती.
या आहेत निवेदनातील मागण्या
तालुक्यातील मुलचेरा-मार्र्कं डा व मुलचेरा-आलापल्ली या दोन मुख्य रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे.
गणेशपूर ते वेलगूर परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने सुंदरनगर येथे ३३ केव्हीचे वीज उपकेंद्र निर्माण करण्यात यावे, तसेच तालुक्यातील भारनियमन बंद करावे.
कर्जमाफी संदर्भात शासनाने जाचक अटी घातल्यामुळे तसेच किचकट आॅनलाईन प्रक्रियेमुळे अनेक शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे मुलचेरा तालुक्यातील शेतकºयांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी.
तालुक्यातील अनेक शेतकºयांचे वनजमिन दावे प्रलंबित असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागेची नव्याने मोजणी करून वनजमिनीचे पट्टे तत्काळ वितरित करण्यात यावे.
डिझेल, पेट्रोल व गॅस सिलिंडरची दरवाढ कमी करण्यात यावी.