शेतकऱ्यांसाठी काँग्रेस लढा उभारणार
By admin | Published: July 13, 2017 01:45 AM2017-07-13T01:45:26+5:302017-07-13T01:45:26+5:30
राज्य शासनाने शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा केली आहे, मात्र लाभार्थ्यांकरिता जाचक निकष लावण्यात येत असल्याने
नामदेव उसेंडी यांची माहिती : कर्जमुक्ती योजनेतून वंचित शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : राज्य शासनाने शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा केली आहे, मात्र लाभार्थ्यांकरिता जाचक निकष लावण्यात येत असल्याने मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. अशा वंचित शेतकऱ्यांचे फॉर्म भरून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसतर्फे लढा उभारण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी दिली.
कुरखेडा येथील विश्रामगृहात बुधवारी पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी ते आले होते. यावेळी चर्चेदरम्यान ते बोलत होते. यापूर्वी काँग्रेस शासनाने सरसकट कर्जमाफी करीत सर्व घटकांना योजनेचा लाभ दिला होता. मात्र भाजप शासनाने अनेक जाचक निकष लावल्याने ही कर्जमाफी फसवी ठरत आहे, असा आरोप डॉ. उसेडी यांनी यावेळी केला. काँग्रेस प्रणीत यूपीएच्या केंद्र शासनाने जीएसटी विधेयकात १८ टक्क्यापर्यंत कर आकारणी प्रस्तावित केली होती. मात्र भाजपच्या शासनाने या विधेयकात २८ टक्के तर काही वस्तूंवर ४३ टक्क्यांपर्यंत कर आकारणी करीत आहे, असा आरोप डॉ. उसेंडी यांनी यावेळी केला. काँग्रेसतर्फे १ बुथ १० युथ ही मोहीम जिल्हाभर राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंत हरडे, गडचिरोलीचे तालुकाध्यक्ष शंकर सालोटकर, जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी, पं. स. सभापती गिरीधर तितराम, उपसभापती मनोज दुणेदार, पं. स. सदस्य शारदा पोरेटी, सुनंदा हलामी, माधुरी मडावी, संजय नाकतोडे, अमोल पवार, रोहित ढवळे, मधुकर गावळे, नगरसेवक उसमान पठाण, सुनील किलनाके आदी पदाधिकारी व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.