२२५ ग्रामपंचायतींना मिळणार कनेक्टिव्हिटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 10:21 PM2019-07-14T22:21:15+5:302019-07-14T22:21:48+5:30
दुर्गम व आदिवासी भागातील २२५ ग्रामपंचायतींना ओएफसी केबलद्वारे इंटरनेट कनेक्टिव्हीटी उपलब्ध करून दिली जाणार आहे. गावात इंटरनेट कनेक्टिव्हीटी मिळाल्याने गावाचे रूप पालटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दुर्गम व आदिवासी भागातील २२५ ग्रामपंचायतींना ओएफसी केबलद्वारे इंटरनेट कनेक्टिव्हीटी उपलब्ध करून दिली जाणार आहे. गावात इंटरनेट कनेक्टिव्हीटी मिळाल्याने गावाचे रूप पालटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
शासनाने प्रत्येक विभागाचा कारभार आॅनलाईन करण्यास सुरूवात केली आहे. याला ग्रामपंचायतीही अपवाद राहिल्या नाही. गावापर्यंत केबल टाकण्याचा खर्च लाखोच्या घरात असल्याने मागील पाच वर्षांपासून केबल टाकण्याचे काम देशभरात सुरू आहे. जिल्ह्यात पहिला टप्पा पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, कुरखेडा हे तालुके घेण्यात आले होते. या तालुक्यांमधील ग्रामपंचायतीमध्ये ओएफसी केबल टाकण्याचे काम आता जवळपास पूर्णत्वास पोहोचले आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात आता धानोरा, कोरची, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली या तालुक्यांमधील ग्रामपंचायतींचा समावेश केला गेला आहे. ओएफसी केबलच्या इंटरनेटची क्षमता साध्या ब्रॉडबँडपेक्षा कित्येक पटीने अधिक राहते. गावात इंटरनेटची सुविधा उपलब्ध झाल्याने विविध आॅनलाईन कामे गावातच करता येणार आहे. या केबलवरून खासगी नागरिकांनाही इंटरनेटची सुविधा घेता येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आज शुभारंभ
ओएफसी केबल टाकण्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते सोमवारी दुपारी २ वाजता होणार आहे. तहसील कार्यालय अहेरी येथे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अहेरी तालुक्यापासूनच दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरूवात केले जाणार आहे, असे कळविण्यात आले आहे.