गायीला पशू मानणे हीच सर्वात मोठी हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2017 12:53 AM2017-01-14T00:53:58+5:302017-01-14T00:53:58+5:30

देशातील ८० कोटी नागरिक गाईला माता समजतात. मात्र देशातील सरकार गायीला पशू मानते. हाच गायीचा सर्वात मोठा अपमान असून सर्वात मोठी हत्या आहे.

Considering the cow as a beast, the biggest murder | गायीला पशू मानणे हीच सर्वात मोठी हत्या

गायीला पशू मानणे हीच सर्वात मोठी हत्या

Next

धेनुमानस गो कथा : गोपाल मनीजी यांचे गडचिरोलीत प्रवचन
गडचिरोली : देशातील ८० कोटी नागरिक गाईला माता समजतात. मात्र देशातील सरकार गायीला पशू मानते. हाच गायीचा सर्वात मोठा अपमान असून सर्वात मोठी हत्या आहे. त्यामुळे गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यात यावा, यासाठी देशभरात आंदोलन छेडण्याची गरज आहे, अन्यथा गाय व संस्कृतीचे अस्तित्व धोक्यात येईल, असा इशारा गोपाल मनीजी महाराज यांनी दिला.
चामोर्शी मार्गावरील हनुमान कुंज लॉन येथे शुक्रवारी सकाळी १० वाजता धेनूमानस गो कथेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रवचन देताना गोपाल मनीजी महाराज बोलत होते. गाय ही देशातील ८० कोटी हिंदूंची आस्था आहे. भारतीय राज्य घटनेमध्ये प्रत्येक नागरिकाच्या आस्थेचा सन्मान करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. या प्रमाणेच गाय ही हिंदूंची आस्था असल्याने गायीचे संरक्षण करणे सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे गाईला राष्ट्रमातेचा सन्मान देण्यात यावा, यासाठी शासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला. मात्र शासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे संपूर्ण देशातून आंदोलन उभे करणे गरजेचे आहे. यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जनजागृती केली जात आहे. गडचिरोली हा २७४ वा जिल्हा आहे. आपण गंगोत्री येथून आलो असल्याचे गोपाल मनीजी यांनी सांगितले.
गाय ही सर्व हिंदूंची आस्था आहे. प्रत्येक हिंदू गायीला मातेसमान दर्जा देते. सरकार मात्र गार्इंची नोंद पशू अशी करते. हा गाईचा अपमान आहे व हीच सर्वात मोठी हत्या आहे. सरकार कत्तल कारखान्यांना परवानगी देते. दुसरीकडे गोहत्या प्रतिबंधक कायदा करते, मात्र यामुळे गायीची हत्या कशी काय थांबणार आहे. सरकार भावनेने नाही तर कायद्याने चालते. इंग्रजांच्या राजवटीपूर्वी गाय ही माताच होती. मात्र इंग्रजांनी तिला पशु मानले. गायीबद्दल हिंदूंची आस्था बाबराला माहित होती. बाबराने त्याचा मुलगा हुमायूला चिठ्ठी लिहिली. त्या चिठ्ठीमध्ये त्याने हिंदूंची शेकडो मंदिरे पाडली तरी चालेल, मात्र गायीला छेडछाड करण्याचा प्रयत्न करू नको, गायीला छेडछाड झाल्यास हिंदू समाज पेटून उठेल, असा इशारा दिला होता.
विदेशातून आणला जाणारा युरिया व जर्सी जातीची गाय हा देशाला सर्वात मोठा शाप आहे. देशात दररोज एक लाख गाई कापल्या जातात. भारतीय समाज कृषीप्रधान आहे. त्यामुळे गाईचे महत्त्व अनन्य साधारण आहे.
गोबरापासून उत्तम खत तयार होते. गोबरापासूनच गोबर गॅस तयार होते व या गोबर गॅसचे रूपांतर सीएनजी गॅसमध्ये केल्यास देशाला पेट्रोल व डिझेलसाठी अरब राष्ट्रांवर अवलंबून राहावे लागणार नाही. देशाची मोठी गंगाजळ वाचेल.
इंग्रज या देशातून गेले. मात्र त्यांनी भारताचे रूपांतर इंडियामध्ये करून ठेवले आहे. इंडियामधील नागरिकांच्या खानपान, संस्कृती, आचारविचार, राहणीमान हे इंग्रजांप्रमाणेच आहेत. हे इंडियामध्ये राहणारे नागरिक भारताची संपूर्ण संस्कृती विसरले आहेत. जो समाज आपली संस्कृती विसरतो, त्या समाजाचे स्वातंत्र्य धोक्यात येते, हे लक्षात घेतले पाहिजे. इंडियातील समाज चरित्राला विसरून चित्राच्या मागे लागला आहे.
कार्यक्रमाला नगराध्यक्षा योगीता पिपरे, प्रमोद पिपरे, नंदकिशोर काबरा, हेमंत राठी, शेषनारायण काबरा, नारायण खटी, प्रकाश अर्जुनवार, गोवर्धन चव्हाण, आनंद शृंगारपवार, मनोज जैन, दिलीप सारडा, जुगलकिशोर काबरा, विनय मडावी आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

स्वतंत्र गोमाता मंत्रालयाची गरज
केंद्र शासनाने गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र गंगा मंत्रालय स्थापन केले आहे. त्याचप्रमाणे गोमातेच्या संरक्षणासाठी स्वतंत्र गोमाता मंत्रालय स्थापन करावे, गायीला राष्ट्रमातेचा सन्मान देण्यात यावा, दहा वर्षापर्यंत बालकाला गाईचे दूध पाजावे, गोबरपासून सीएनजी गॅस तयार करावे, शेतकऱ्यांचे गोबर दहा रूपये किलोने खरेदी करावे, गोहत्या करणाऱ्यांना फाशी देण्यात यावी या पाच प्रमुख मागण्यांसाठी देशभरात आंदोलन उभे करणे गरजेचे आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनाप्रमाणेच मोठे आंदोलन उभारण्याची गरज आहे.

गाई कमी झाल्याने युरिया या विषाची आयात वाढली
देशात गार्इंची संख्या मोठ्या प्रमाणात होती. शेतकरीवर्ग शेतीसाठी खत म्हणून गाईच्या गोबरचा वापर करीत होता. त्यामुळे शेतकऱ्याला रासायनिक खत खरेदी करण्याची गरज पडत नव्हती. मात्र औद्योगिकरणामुळे गायींची संख्या कमी झाली. परिणामी शेणखत आपोआप कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर करावा लागला. सरकार विदेशातून युरिया खत आयात करते. यावर देशाची फार मोठी गंगाजळ खर्च होते. त्याचबरोबर या खतामुळे देशातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे गायींची संख्या आणखी वाढविणे गरजेचे आहे.

Web Title: Considering the cow as a beast, the biggest murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.