नक्षलवादी समजून ‘पब्लिक टार्गेट’, छत्तीसगड पोलिसांवर पत्रक‘बॉम्ब’

By संजय तिपाले | Published: May 22, 2024 05:39 PM2024-05-22T17:39:41+5:302024-05-22T17:41:41+5:30

जनआंदोलनाची तयारी : १०७ जण गमावल्याचा घाव नक्षल्यांच्या जिव्हारी

Considering Naxalites as 'public target', Chhattisgarh police got a letter | नक्षलवादी समजून ‘पब्लिक टार्गेट’, छत्तीसगड पोलिसांवर पत्रक‘बॉम्ब’

Considering Naxalites as 'public target', Chhattisgarh police got a letter

गडचिरोली : छत्तीसगडसह महाराष्ट्रातील नक्षलवादी कारवायांचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अबुझमाडच्या विस्तीर्ण जंगलात पाच महिन्यांत १०७ नक्षल्यांचा छत्तीसगड पोलिसांनी खात्मा केला. छत्तीसगड व महाराष्ट्र पोलिसांकडून नक्षलविरोधी मोहीम अधिक तीव्र झाल्याचा घाव नक्षल्यांच्या जिव्हारी लागला आहे. नक्षलवादी समजून छत्तीसगड पोलिसांनी सामान्यांना गोळीचा निशाणा बनवल्याचा गंभीर आरोप पत्रकातून केला आहे. हे पत्रक २२ मे रोजी समोर आले आहे.


महाराष्ट्र - छत्तीसगड सीमेवरील अबुझमाड हा नक्षल्यांचा गड आहे. गडचिरोली पोलिसांची नक्षलविरोधी मोहीम, कम्युनिटी पोलिसींग यामुळे नक्षलचळवळीला हादरे बसले. अनेक नक्षली नेते चकमकीत ठार झाल्याने जिल्ह्यात ही हिंसक चळवळ काहीशी कमकुवत झाली आहे. मात्र, छत्तीसगडमध्ये नक्षल्यांच्या कुरापती सुरुच असतात. तेथे नक्षल्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे तेथील पोलिसांनीही नक्षलविरोधी अभियान गतिमान केले आहे. पाच महिन्यांत तब्बल १०७ नक्षल्यांना तेथील पोलिसांनी कंठस्नान घातले. मात्र, माओवादी संघटनेचा पश्चिम सब झोनल ब्युरो श्रीनिवास याने एक पत्रक जारी करुन छत्तीसगड पोलिसांच्या कायपध्दतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.    

वन्यप्राण्यांच्या दहशतीत आदिवासी वर्षानुवर्षे जंगलात राहतात. मात्र, नक्षलवादी ठरवून निरपराध लोकांचा बळी घेतला जात असल्याचा आरोप केला आहे. याविरुध्द जनआंदोलनाची हाक दिली असून वकील, लेखक, कलावंत, विद्यार्थी अशा बुध्दीजिवी घटकांना साद घातली आहे.
 

पत्रकातील आरोप असे...
छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्याच्या काकूर- टेकामेट्टा जंगलात पारंपरिक पूजापाठ करण्यासाठी काही महिला गेल्या होत्या. गावकऱ्यांसमोर या जंलगात चार युवकांना पोलिसांनी गोळी झाडून संपविले. याच परिसरात त्याच दिवशी सहा जणांना ठार कलेे.
१० मे रोजी बिजापूरच्या  जंगलात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या गावातील १२ जणांना घेरले व गोळ्या झाडून संपविले, असे गंभीर आरोप या पत्रकात करण्यात आले आहेत.

कतरंगट्टा चकमकीनेही दुखावले नक्षली
भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा येथे १३ मे रोजी झालेल्या चकमकीत पेरमिली दलम प्रभारी व विभागीय समिती कमांडर वासू कोरचा, कंपनी क्र. १० ची सदस्य रेश्मा मडकाम व पेरमिली दलम सदस्य कमला मडावी यांना पोलिसांनी कंठस्नान घातले होते. यावरुनही पत्रकातून नक्षल्यांनी गडचिरोली पोलिसांवर आरोप केले आहेत. या चकमकीनेही नक्षलवाद्यांना हादरा पोहोचल्याचे पत्रकातील तपशीलावरुन स्पष्ट होत आहे.
 

या पत्रकाबद्दल माहिती नाही. ते पत्रक पाहण्यात आले नाही. मी सध्या सुटीवर आहे, त्यामुळे याबद्दल मला अधिक सांगता येणार नाही.
-  सुंदरराज पत्तीलिंगम, विशेष पोलिस महानिरीक्षक बस्तर, छत्तीसगड

 

Web Title: Considering Naxalites as 'public target', Chhattisgarh police got a letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.