नवरगावातील वादावर 'संविधाना'चा तोडगा; चौकाला संविधान नाव देण्याचा निर्णय, ५६ कुटुंबे परतणार स्वगावी

By संजय तिपाले | Published: December 23, 2023 06:47 PM2023-12-23T18:47:35+5:302023-12-23T18:47:49+5:30

चामोर्शी तालुक्यातील नवरगाव येथे महापुरुषांच्या नावाच्या फलकावरुन वर्षभरापासून वाद आहे.

Constitutional solution to dispute in Navargaon Decision to name the square Constitution, 56 families will return to their hometown | नवरगावातील वादावर 'संविधाना'चा तोडगा; चौकाला संविधान नाव देण्याचा निर्णय, ५६ कुटुंबे परतणार स्वगावी

नवरगावातील वादावर 'संविधाना'चा तोडगा; चौकाला संविधान नाव देण्याचा निर्णय, ५६ कुटुंबे परतणार स्वगावी

गडचिरोली: महापुरुषांच्या नावाचा फलक लावण्यावरुन दोन गटात वाद झाल्यानंतर ५६ दलित कुटुंबांनी बिऱ्हाड बैलगाडीत टाकून गाव सोडल्याची धक्कादायक घटना चामोर्शी तालुक्यातील नवरगावात घडली होती. या कुटुंबांनी आंदोलन करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला होता. मात्र, तोडगा निघू शकला नव्हता. अखेर २३ डिसेंबर रोजी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या दालनात झालेल्या बैठकीत दोन्ही गटाच्या लोकांना समोरासमोर बसवून समेट घडवून आणण्यात यश आले. या चौकाला संविधान नाव देण्याचा निर्णय झाला.

चामोर्शी तालुक्यातील नवरगाव येथे महापुरुषांच्या नावाच्या फलकावरुन वर्षभरापासून वाद आहे. हा वाद न्यायालयापर्यंत गेलेला आहे. ग्रामसभेने अधिकाराचा वापर करुन अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान २१ डिसेंबरला पोलिस बंदोबस्तात फलक हटविला. त्यानंतर दलित समाजाच्या ५६ कुटुंबातील सव्वादोनशे सदस्यांनी तीव्र रोष व्यक्त करत लहान मुले, धान्य, कपडे घेऊन बैलगाड्यांतून गाव सोडले.  शिवणी गावालगतच नदीकिनारी या सर्वांनी अंधारात थंडीत कुडकुडत रात्र काढली.  २२ डिसेंबरला घोषणा देत हे सर्व जण शहरात पोहोचले. इंदिरा गांधी चौकात निषेध सभा घेतल्यानंतर बैलगाड्यांसह मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडविले.

तोडगा न निघाल्याने या कुटुंबांनी नवेगाव बुध्द विहारात मुक्काम केला. २३ डिसेंबरला सरपंच खुशाल कुकडे यांच्यासह गाव सोडलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या शिष्टमंडळाला पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पुढाकार घेत समोरासमोर आणले. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा उपस्थित होते. दोन्ही गटाचे म्हणणे ऐकून घेतल्यावर सामोपचाराची भूमिका घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा व पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले. त्यानंतर संविधान नावावर एकमत झाले व सामंजस्याने वादावर पडदा पडला. त्यामुळे तणाव निवळला आहे.

पोलिस बंदोबस्तात गावी सोडणार
नवरगाव येथील वाद मिटविण्यासाठी झालेल्या बैठकीत संविधान या नावावर दोन्ही बाजूंनी एकमत झाले.  नामफलक उभारताना कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यास सांगितले आहे. या गावाला वादाची पार्श्वभूमी नाही. त्यामुळे यापुढेही एकोपा कायम ठेवावा, असे आवाहन केले आहे. गाव सोडलेल्या ५६ कुटुंबाना पोलिस बंदोबस्तात पुन्हा स्वगावी पोहोचविले जाणार आहे. दोन्ही बाजूंनी समजदारीची भूमिका घेतली गेली त्यामुळे नवरगाव येथील वाद सामोपचाराने मिटला आहे. कुठल्याही परिस्थितीत शांतता व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घ्यावी. - संजय मीणा, जिल्हाधिकारी
 

Web Title: Constitutional solution to dispute in Navargaon Decision to name the square Constitution, 56 families will return to their hometown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.